Skip to main content

कारसेवक म्हणजे नक्की काय आणि कारसेवक कोणाला म्हणले जाते ?



कारसेवक म्हणजे नक्की काय आणि कारसेवक कोणाला म्हणले जाते ?

देशात पुन्हा एकदा राम मंदिराचा मुद्दा चर्चेत आहे. अनेक राजकीय नेते, धर्मरक्षक, अनेक संघटना सर्वजण या विषयवार राजकारण करण्यात व्यस्त आहेत. काहीजण म्हणतात की अयोध्येत लवकरात लवकर राम मंदिर बांधले जावे, तर कोणी त्यास विरोध करत आहे.

लवकरच सर्वोच्च न्यायालय या वादाशी संबंधित खटल्याचा निकाल देणार आहे. ज्या ज्या वेळेस अयोध्या राममंदिर वादाचा विषय येतो त्या त्या वेळेस कारसेवक किंवा कारसेवा हा शब्द आपल्या वाचण्यात किंवा ऐकण्यात आला असेल. परंतु आपल्याला या शब्दाचा अर्थ माहित आहे काय ? चला तर आज यानिमित्ताने जाणून घेऊया कारसेवक किंवा कारसेवा म्हणजे काय…

६ डिसेंबर १९९२ रोजी अयोध्येतील बाबरी मशीद पाडल्यानंतर ‘कारसेवक’ हा शब्द चर्चेत आला आहे

लाखो कारसेवकांनी राममंदिर निर्माण आंदोलनात सहभाग घेतल्याचे म्हटले जाते. कारसेवक या शब्दातील कारचा आपण समजतो त्या कार वाहनाशी अजिबात संबंध नाही.

मुळात कारसेवक हा संस्कृत शब्द आहे. यामध्ये ‘कार’ म्हणजे कर आणि ‘सेवक’ म्हणजे सेवा देणारा. जास्तकरुन धार्मिक गोष्टींमध्ये लोक अशी निस्वार्थ सेवा देत असतात. 

कारसेवकला इंग्रजीत व्हॉलिंटियर असा शब्द वापरला जातो. थोडक्यात जी व्यक्ती निस्वार्थ भावनेने सेवा देते आणि धर्माचे रक्षण करण्यासाठी पाऊले उचलते त्यांना कारसेवक म्हणतात.

जालियनवाला बाग हत्याकांडाच्या दरम्यान चर्चेत आला होता कारसेवक हा शब्द

शीख धर्मग्रंथांमध्येही कारसेवा या शब्दाचा उल्लेख अनेक ठिकाणी सापडतो. 

गुरुद्वारामधील लोक निस्वार्थ भावनेने धार्मिक सेवा करतात. 

असे म्हटले जाते की कारसेवा ही शीख धर्माचीच शिकवण आहे. जालियांवाला बाग हत्याकांडाच्या काळात क्रांतिकारक उधमसिंग यांनी कारसेवा केली होती. 

१९८३ मध्ये अमृतसर येथील प्रसिद्ध सुवर्ण मंदिराची निर्मिती देखील कारसेवेच्या माध्यमातूनच झाल्याचे सांगितले जाते. कारसेवा या शब्दाचे स्पेलिंग C या शब्दाने नाही, तर K या शब्दाने सुरु होते.

आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य लाईक आणि शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आपल्या कडील खासरे माहिती तुम्ही आम्हाला info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवू शकता.




Loksatta APP

    कार सेवा म्हणजे काय? नक्की काय केलं देशभरातल्या कारसेवकांनी?


    १९९० मध्ये आडवाणींनी काढली होती सोमनाथ ते अयोध्या रथयात्रा

    👉सर्वप्रथम १९८९ मध्ये बहुदा हेडगेवार जन्मशताब्दीनंतर लगेच श्रीराम जन्मभूमी आंदोलनासाठी विश्व हिंदू परिषदेतर्फे जनजागरण सुरू करण्यात आलं होतं. तसंच 

    👉रामजन्मभूमीसाठी प्रत्येकाकडून एक प्रतिज्ञापत्र आणि एक रुपयाही जमा करण्यात आला होता. त्यानंतर 

    👉श्रीराम असं कोरलेल्या वीटा अयोध्येत पाठवण्यात आल्या होते. 

    👉त्यानंतर १९९० मध्ये गुजरातमधील सोमनाथमधून अयोध्येपर्यंत लालकृष्ण आडवाणी यांनी रथयात्रा काढली. त्यानंतर 

    👉१९९२ मध्ये बाबरी मशीद पाडण्यात आली

    👉विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यावेळी कारसेवकाची भूमिका बजावली होती.


    यासाठीचा घटनाक्रम असा की 

    १९८६ मध्ये नवव्या लोकसभेच्या निवडणुका पार पडणार होत्या. 

    👉त्यातच निवडणुकांपूर्वी फैजाबाद न्यायालयानं बाबरी मशिदीसंदर्भात असलेल्या वादग्रस्त जागेला असलेलं टाळं उघडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर तत्कालिन काँग्रेस सरकारनं न्यायालयाच्या निर्णयानुसार ते टाळं उघडलं. 

    परंतु त्यानंतर सर्वोच्च न्यायालयानं हा निर्णय रद्दहबातल ठरवला. 

    👉१९८९ मध्ये लालकृष्ण आडवाणी यांनी सोमनाथमधून तब्बल १० हजार किलोमीटरची रथयात्रा काढण्याचा निर्णय घेण्यात आला होता. दरम्यान, 

    👉ही रथयात्रा काढण्याचा निर्णय विचारपूर्वकच घेण्यात आला असल्याचं इंडियन एक्स्प्रेसमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका लेखात लालकृष्ण आडवाणींच्या हवाल्यानं सांगण्यात आलं होतं. 

    👉गुजरात, महाराष्ट्र, आध्र प्रदेश, मध्यप्रदेश, बिहार अशा राज्यांमधून ही रथयात्रा अयोध्येला पोहोचली. परंतु बिहारमध्ये आडवाणींना अटक करण्याच आली.

    आणखी वाचा- प्रभू रामचंद्रांसाठी बलिदान: साबरमती एक्स्प्रेसमधून बचावलेल्या कार सेवकांची गोष्ट

    👉अयोध्येत कारसेवेसाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून अनेक जण सहभागी झाले होते.

     👉प्रेमशंकर दास यांनीदेखील कारसेवा करतानाचा आपला अनुभव मांडला होता.

     👉प्रेमशंकर दास त्यावेळी २१-२२ वर्षांचे होते आणि वादग्रस्त ढाचा पाडण्यासाठीच अयोध्येत आले होते, असं त्यांनी एका मुलाखतीदरम्यान म्हटलं होतं. 

    👉“कोणही कोणत्याही प्रकारचे निर्देश दिले नव्हते किंवा कोणी काय करायचं हेदेखील सांगण्यात आलं नव्हतं. याचं श्रेय सर्वांचं आहे. तो वादग्रस्त ढांचा पाडण्याचं श्रेय केवळ कारसेवकांनाच आहे,” असंही त्यांनी सांगितलं होतं.

    आणखी वाचा- राम मंदिराचा मुद्दा ते केंद्रात सत्ता, जाणून घ्या भाजपाचा प्रवास

    दरम्यान, त्यावेळी त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या राजेश प्रभू-साळगांवकर यांनीदेखील लोकसत्ता ऑनलाइनशी बोलताना आपला अनुभव सांगितला. 

    👉“६ डिसेंबर रोजी सकाळी नऊ वाजता आम्ही श्रीराम जन्मभूमी जवळ पोहोचलो. बाबरी शेजारी एका इमारतीच्या गच्चीवर मंच बांधला होता. त्यावेळी जवळपास ५-६ लाख जण श्रीराम जन्मभूमी परिसरात होते. बाबरीचा ढांचा दिसेल अशा उंचवट्यावर आम्ही बसलो होतो. मंचावरून नेत्यांची आणि संतांची भाषणे सुरु झाली. तसंच या ठिकाणी आपली जागा न सोडण्याचे सक्त आदेश आम्हाला देण्यात आले होते

    अडवणींचे, उमा भारतींचे, दलमियाजींचे आणि सिंघल यांचे याठिकाणी भाषण झाल्यानंतर रामनामाचा मंचावरून जप सुरू झाला,” असं त्यांनी बोलताना सांगितलं.

    आणखी वाचा- अयोध्या-बाबरी वादामुळे कशी पेटली मुंबई?

    👉“त्यानंतरच अचानक समोरून एक गलका ऐकू येऊ लागला. 

    👉काही जण बाबरीच्या ढाचाच्या घुमतांवर चढून भगवा फडकवताना आम्हाला दिसले. 

    👉परंतु त्यानंतर त्या ठिकाणी असलेले काही जण घोषणा देत पुढे जाण्याचा प्रयत्न करू लागले. 

    👉प्रत्येक गटनेत्यांने आपापल्या गटाला कसेबसे आवरून धरले होते

    👉कारण दिलेल्या सूचनांचे पालन करणे हीच संघाची शिस्त आहे, असे ते प्रत्येकला समजावत होते

    👉मात्र तरी काही जण निसटून पुढे गेले. 

    👉त्यानंतर त्या ठिकाणी असलेल्या एका व्यक्तीनं घुमटावर घाव घातला. 

    👉त्यानंतर काही पुजारी आणि साधू संत रामलल्लाच्या मूर्ती घेऊन बाहेर येताना दिसले

    👉रामधून बदलून लोक “एक धक्का और दो” च्या घोषणा देऊ लागले होते

    👉मूर्ती हलवून झाल्यानंतर अवघ्या काही मिनिटांच्या कालावधीतच पहिला घुमट कोसळला. 

    👉तिकडे साध्वी ऋतांबरा ही अशाच स्वरूपाच्या घोषणा देत होत्या. 

    या घटनेला आता अनेक वर्षे झाली आहेत. तसंच आता राम मंदिराच्या उभारणीचं कामही सुरू झालं आहे. दरम्यान आता एवढ्या वर्षांनी केवळ राम मंदिर दिमाखात उभं राहावं हिच इच्छा आहे,” असंही प्रभू-साळगांवकर बोलाताना सांगतात.

    लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल(@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक कराआणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


    एक 'होता' कारसेवक...

     | Updated: 30 Sep 2010, 12:00:00 AM

    विनय उपासनीअयोध्येतील वादग्रस्त वास्तूवर घाव घालण्याचं काम सुरूच होतं. वाहत्या गंगेत आम्हीही हात धुवून घेतले. पराक्रमाचं प्रतीक म्हणून दोन विटा घेऊन तिथून बाहेर पडलो. जीवनाचं सार्थक झाल्याचं त्या क्षणी तरी वाटलं... परंतु आज १८ वर्षांनंतर कारसेवकाच्या आपल्या भूमिकेकडे त्रयस्थपणे पाहताना मन निराश झालंय... सांगतायत विनय उपासनी.

    एक 'होता' कारसेवक...
    - विनय उपासनी

    👉दहावी पास होऊन नुकताच कॉलेजविश्वात प्रवेश केला होता

    👉डोंबिवली सोडून नाशिकला शिफ्ट झाल्यानं तसं मित्रांचं वर्तुळ फारसं नव्हतंच. त्यामुळे मग घरानजीकच्या संघशाखेवर नियमित जाणं सुरू झालं. 

    👉अकरावीचा प्रवेश, संघशाखेवर होणारी बौद्धिकं, त्या माध्यमातून होणारी चर्चा, अभाविपच्या कार्यकर्त्यांशी होणारी ओळख, कॉलेजातील मित्रांमधील चर्चा, घरात चालणारी चर्चा, देशातलं एकंदर वातावरण, मंदिर-मशीद वाद... या सर्वांतून मत तयार होत होतं

    👉आणि त्याच सुमारास अभाविपच्या कार्यकर्त्यांची कारसेवेला जाण्याची तयारी सुरू होती. तू येशील का? 

    👉आमच्या संघशाखेवरच्या गुरुजींनी अचानक प्रश्न विचारला. 

    👉अर्थात घरच्यांना विचारून सांगतो असं उत्तर. 

    👉घरच्यांचा प्रथम विरोध होता, मात्र थोरल्या बंधूंनी पाठिंबा दिला. झालं, जाण्याचं नक्की ठरलं.

    ३० नोव्हेंबर १९९२ रोजी दुपारी अभाविपतर्फे आमचे ३० जणांचे पथक पवन एक्स्प्रेसने अयोध्येला रवाना झालं. पथकात सर्वात लहान म्हणून आम्हा दोघा-तिघांचं जरा अतिकौतुक आणि काळजीची हमी. त्यामुळे निर्धास्त होतो. 

    👉अयोध्येला जाऊन नेमकं काय करायचंय याचा काही पत्ता नव्हता.

     मात्र, प्रवासात हरिभाऊंनी (आमचे गटप्रमुख) आपल्या जाण्यामागची भूमिका विशद केली. 

    👉रामाच्याच जन्मभूमीत अर्थात अयोध्येत राम कसा वनवास भोगतोय, आपण काय करायला हवं, प्रवासात प्रत्येक ठिकाणी दिसणारं-जाणवणारं वातावरण, त्यामुळे एकीकडे पक्कं मत तयार होत होतं. 

    👉सौगंध राम की खाते है..., एक धक्का और दो..., ये तो एक झाँकी है..., अयोध्या की माटी..., अब तो नगारा बज ही गया है... या व अशा घोषणांनी वातावरण अंगात भिनत होतं. 

    गाणी-घोषणा-बौद्धिकं 

    मध्य प्रदेश, दिल्ली, उत्तर प्रदेश या प्रांतातून गाडीत चढणारी कारसवेकांची पथकं, ओळखी-पाळखी, पुन्हा चर्चा असं करत करत २ डिसेंबरच्या पहाटे अयोध्येला आम्ही पोहोचलो.

    देशाच्या कानाकोप-यातून कारसेवक जमायला सुरुवात झाली होती. 

    आंध्र प्रदेश, केरळ, तामिळनाडू, गुजरात, महाराष्ट्र, दिल्ली उत्तरेकडील राज्ये अशी विविध ठिकाणांहून लाखो कारसेवक अयोध्यानगरीत पोहोचले होते-पोहोचत होते. 

    👉आमची व्यवस्था रामनगरी नावाच्या एका मंडपात केली होती. 

    शरयूतिरावरच राहण्याची व्यवस्था, थंडी प्रचंड, मात्र अंगात उत्साह. पथकात बहुतेकजण तरुणच. त्यामुळे दोनच दिवसांत प्रत्येकाशी चांगलीच गट्टी-भट्टी जमली. त्यामुळे आपण परक्या ठिकाणी आलोय असं वाटतंच नव्हतं. 

    ३ डिसेंबरपासून सकाळी उठून शरयूत आंघोळ. विविध प्रांतातून आलेल्या कारसेवकांच्या ओळखी. मग कारसेवकांसाठी सुरू केलेल्या अन्नछत्रालयांत जाऊन खाणं-पिणं झालं की दिवसभर अयोध्येची भ्रमंती असा दिनक्रम सुरू झाला

    दुपारपर्यंत भटकणं आणि मग सायंकाळी प्रत्यक्ष वादग्रस्त जागेपासून काही अंतरावर सुरू असलेल्या साधुसंतांच्या आखाड्यात जाऊन बसायचं. 

    त्या ठिकाणी दिवसभर कोणाची ना कोणाची भाषणं सुरूच असायची. मग त्यात साध्वी ऋतंभरा, आचार्य गिरिराज किशोर, विनय कटियार, उमा भारती या धार्मिक (?) नेत्यांचा समावेश असायचा.

    शेकडो वर्षांपासून रामाची जन्मभूमी कशी परकीयांच्या जोखडात अडकली आहे, समोर उभी असलेली वास्तू म्हणजे मूर्तिमंत कलंक, ती पाडून त्या ठिकाणी मंदिराची उभारणी करणं कसं समस्त हिंदूंचं परमकर्तव्य आहे, त्यासाठी आपण इथे जमलो आहोत... अशा आशयाची ती भाषणं. 

    मग त्यात आतापर्यंतच्या सर्व सरकारांचा उद्धार, हिंदुत्त्ववादी सरकार सत्तेत आल्यास रामराज्य कसं अवतरणार याची स्वप्न दाखवणं अशा सर्व मुद्यांचा या नेत्यांच्या भाषणात समावेश असायचा.

    अयोध्येत फिरतानाही पोलिसही कोणाला हटकत नव्हते. 

    त्यामुळेच अरे बघता काय, सामील व्हा... अशा घोषणा त्यांच्यासमोर तारस्वरात देणं जमत होतं. 

    प्रत्यक्ष कारसेवेची तारीख जसजशी जवळ आली तसतसं अयोध्येतलं वातावरण तापू लागलं होतं. 

    आमच्या फिरण्यावर बंधन घातली जात होती. आमच्याबरोबर सातत्याने कोणीतरी वरिष्ठ राहील याची काळजी घेतली जात होती.

     सूचना, कोणी कुठे कसं जायचं, हरवलं तर कुणाशी कसा संपर्क साधायचा, गटातील प्रत्येकाला दिलेला संकेतांक, निरनिराळ्या प्रांतातील कारसेवकांशी चर्चा, वादग्रस्त जागेभोवती पोलिसांचे, सुरक्षा दलांचे वाढत जाणारे सुरक्षाकवच, नेत्यांच्या भाषणात येऊ लागलेला आक्रमकपणा सारंसारं हे एका अघटिताची जाणीव करून देत होतं. 

    मात्र, त्यावेळी कट्टरपणा एवढा अंगात भिनला होता की जे होतंय, जे होणार आहे ते देशहिताचंच आहे हा ठाम विश्वास बनत चालला होता. 

    आक्रमक नेत्यांची भाषणं अधिकाधिक आक्रमक होत चालली होती, कारसेवकांचा उत्साह शिगेला पोहोचला होता, मंदिर वही बनाएंगे..चा जयघोष टिपेला पोहोचू पाहत होता, सर्व शासकीय यंत्रणा मात्र हातावर हात ठेवून पहात होती, त्यामुळे सर्वजणच निश्चिंत होते.

    ५ डिसेंबरची अख्खी रात्र वादग्रस्त जागेनजीकच काढली.

    ६ डिसेंबरला पहाटे आमच्या निवासात (म्हणजे उघडा मंडपच तो) परतलो. मात्र, सकाळी हरिभाऊंनी आम्हाला सर्वांना लवकरच उठवलं. 

    आन्हिकं आटोपून चर्चासत्राला (म्हणजे मीटिंगला) हजर राहण्याचं ठरलं. सर्वजण सकाळी साडेआठला चर्चासत्राला जमले.

     कोणी कुठे थांबायचं, कोणी कुठे जायचं, कोणाशी संपर्क साधायचा, कोणी मागे थांबायचं सारी व्यूहरचना झाली. 

    सकाळी दहापासूनच सर्वांनी वादग्रस्त जागेच्या (ते आमच्या ठिकाणापासून किमान दोन-तीन किमी अंतरावर होतं) परिसरात जायचं ठरलं

    त्या ठिकाणी गेल्यानंतर वातावरणातला उन्माद जाणवत होता. समोरच्या दुमजली इमारतीच्या गच्चीवर अडवाणी, वाजपेयी, साध्वी ऋतंभरा, उमा भारती, विहिंपचे नेते अशोक सिंघल आदी रथी-महारथी नेते जमले होते. सर्वांची भाषणे सुरू होती. 

    एकीकडे रामनामाचा जप, रामाचा जयघोष, मंदिर वही बनाएंगे, एक धक्का और दो... या घोषणांना जोर चढत होता

    दुपारपर्यंत सर्व नेत्यांची भाषणं झाली. दुपारच्या जेवणासाठी आम्हा कार्यकर्त्यांना मंडपात जाण्यास सांगण्यात आले आणि पुढची सूचना येईपर्यंत तिथेच थांबायचे आदेशही...

    दुपारी तीन-चारच्या दरम्यान मंडपात गोंधळाला सुरुवात झाली. गुम्बत गिरा दिया... कारसेवकोंने मस्जिदपर धावा बोल दिया... बोलो सियावर रामचंद्र की जय... बाबरी ध्वस्त हो गई... रामजी की सेना चली... अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. 

    आम्हीही मुठी आवळून घोषणाबाजी करत प्रत्यक्ष घटनेच्या ठिकाणी धाव घेण्याचा प्रयत्न केला, मात्र वरिष्ठांनी अडवलं. 

    समोर पोलीस बंदोबस्तही वाढल्याचं दिसत होतं. सायंकाळी उशिरा अखेरीस आम्हाला वादग्रस्त ठिकाणी वरिष्ठांनी नेलं. 

    सगळीकडे धुळीचं साम्राज्य, वादग्रस्त जागेभोवतालची सर्व बॅरिकेड्स तोडून कारसेवक आत घुसल्याचं स्पष्ट होतं, पाडलेल्या वास्तूवर घाव घालण्याचं काम सुरूच होतं, वाहत्या गंगेत आम्हीही हात धुवून घेतले. पराक्रमाचं प्रतीक म्हणून दोन विटा घेऊन तिथून बाहेर पडलो. जीवनाचं सार्थक झाल्याचं त्या क्षणी तरी वाटलं. 

    वातावरण अनुभवण्यासाठी अयोध्येत फिरायचं होतं. मात्र कर्फ्यु असल्याने मंडपाकडे परतावं लागलं. काम फत्ते झालंय, नाशिकला परतण्याचं ठरलं. पोलिसांच्या गराड्यात कारसेवकांचे जत्थे अयोध्या स्टेशनकडे परतत होते. मिळेल त्या गाडीने फैजाबाद गाठण्याची, पर्यायाने घरी परतण्याची प्रत्येकाची घाई चालली होती. घोषणांनी अयोध्या दुमदुमत होती. तिकडे देशात काय परिस्थिती उद्भवली होती किंवा उद्भवणार आहे, आणि आपण नेमकं काय केलंय हे समजायला बराच उशीर लागला...


    अयोध्येतून परततानाच त्याची प्रचिती आली. फैजाबादमध्ये आमच्या गाडीवर दगडफेक झाली तेव्हा परिस्थितीची जाणीव झाली. मात्र, गांभीर्य कळलं नाही... घरी फोन करून ख्यालीखुशाली कळवली होतीच. घरचे चिंताक्रांत, नाशकात कर्फ्यू लागल्याचं समजलं. कर्फ्यू तोडून विजयसभा झाल्याचंही कळलं. ८ डिसेंबरला घरी परतलो त्यावेळी आपण काय केलंय त्याची जाणीव झाली. बाबरीच्या पतनानंतर देशातलं वातावरण ढवळून निघालं होतं. पुढचा सारा इतिहास ज्ञात आहेच...

    ....

    आज १८ वर्षांनंतर कारसेवकाच्या आपल्या भूमिकेकडे त्रयस्थपणे पाहताना मन निराश होतंय.

     तो उन्माद, तो जोश, तो कट्टरपणा, तो साहसवाद... सारंसारं गळून पडलंय. 

    अर्थात ही मनोवस्था एका रात्रीत बदललेली नाही.

     बाबरी पतनानंतर देशात, मुंबईत उसळलेली दंगल, मुंबईतली बॉम्बस्फोट मालिका, गुजरातची दंगल, ‘ते’ आणि ‘आपण’ यात रुंदावलेली दरी, हजारो निरपराधांचे बळी, दुभंगलेली मने, राजकारण्यांचा स्वार्थीपणा, देश म्हणून झालेलं नुकसान, हाती काल लागलं याची कॅलक्युलेशन या सर्वाची टोटल एकच झाली, जे झालं, जे केलं ते नक्कीच कौतुकास्पद नव्हतं. 

    काय मिळालं असं करून हाच एक प्रश्न मनात उरलाय, उरतोय. धर्म, जात, धर्माभिमान, जाज्ज्वल्य हिंदुत्त्ववाद, हे सारं एका ठिकाणी आणि मानवता, देश, धार्मिक सहनशीलता, सहजीवन, देशाचा विकास, तरुणांच्या समस्या हे दुस-या बाजूला. दोन्ही एका तराजूत मोजलं तर दुस-या बाजूचे पारडे जड राहील हे नक्की.

    👉मग काय मिळवलं असं करून हा प्रश्न अद्याप निरुत्तर आहेच. 

    त्यांचं आणि आपलं सहजीवन अपरिहार्य आहे याची खात्री पटत चालली आणि पूर्णपणे पटली आहे. 

    मग काय मिळतं असं करून. पाण्यात काठी मारल्याने ते दुभंगणार नाही हे माहीत असूनही का मारायची काठी. वरच्या तरंगांसाठी?, 

    👉मंदिर-मशीद नाही बनली तर सर्वसामान्यांचं कुठे अडलंय, 

    गेल्या अठरा वर्षांत कोणाचं अडलं नाही आणि यापुढेही अडणार नाही. का म्हणून पुन्हा तेच वातावरण तयार करायचं, कोणासाठी, वाढती बेरोजगारी, दहशतवाद, शेजारी राष्ट्रांच्या वाढलेल्या भारतविरोधी कारवाया ही संकटं कमी आहेत का? 

    उद्या अयोध्येचा निकाल काहीही लागला तरी सौगंध राम की खाते है पुन्हा म्हणावसं वाटेल असं वाटत नाही. झालं ते पुरे झालं. 

    अर्थात हा विचार दोन्ही बाजूने होणं महत्त्वाचं आहेच. तसा होतही आहे. दोन दशकाच्या अनुभवातून आपण एवढे तरी शिकलो हे समाधानाचं.

     देश म्हणून उभं राहण्यासाठी सहजीवन, धार्मिक सहनशीलता हेच महत्त्वाचं आहे याची खात्री पटलीय. 

    धर्माचा अभिमान बाळगावा परंतु तो एका विशिष्ट चौकटीत राहून बाळगायला हवा याची समज खूप आधीच आली आहे.

    तसाच तो इतर धर्मांचा आदर बाळगावा हे मतही पक्कं झालंय. त्यातच आपल्या देशाचं हित सामावलंय...

    जय श्रीराम!!!

    vinay.upasani@timesgroup.com
    ६ डिसेंबर १९९२ला नेमकं काय झालं?

    ०६ डिसेंबर २०१८

    वाचन वेळ : १७ मिनिटं


    ६ डिसेंबर १९९२ला अयोध्येत बाबरी मशीद पाडली तेव्हा ज्येष्ठ पत्रकार प्रताप आसबे अयोध्येत होते. याची चौकशी करणाऱ्या लिबरहॅन आयोगासमोरही त्यांची साक्ष झाली होती. अयोध्या दौऱ्याचं त्यांनी महाराष्ट्र टाइम्ससाठी केलेलं वृत्तांकन हा ऐतिहासिक दस्तावेज आहे. ते आज नव्या वाचकांसाठी. 

    २ डिसेंबर १९९२, लखनौ
    अयोध्येच्या वाटेवर चर्चा ठाकरे यांचीच

    कारसेवकांच्या गर्दीने खचाखच भरलेले लखनौ रेल्वे स्थानक. त्यात महाराष्ट्रातील किमान तीन ते चार हजार कारसेवक. तरुणांपासून म्हातारे-कोतारे सर्वजणच डोक्याला भगवे पट्टे लावून फिरताना दिसत होते. 'मंदिर वही बनाएंगे' अशा घोषणा. महाराष्ट्रातील महिला कारसेविकाही जागोजाग नजरेस पडत होत्या. बहुतेक ग्रामीण भागातल्या. वारीला निघावं तश्या तयारीनं कारसेवेला निघालेल्या. 'राम लल्ला हम आयेंगे. मंदिर वही बनायेंगे'. या त्यांच्या घोषणेने सर्वांचं लक्ष आकर्षित करून घेत होत्या. महिलांनी आपल्या दंडाला भगव्या पट्ट्या बांधल्या होत्या. तर खेडुतांच्या छातीवर नाव, गाव, पत्ता लिहिलेले बिल्ले अडकवलेले होते.

    पुणे जिल्ह्यातील सातशे कारसेवकांचा जथ्था लखनौत दाखल झाला होता. रा. स्व. संघाचे कार्यवाह पुणे जिल्हा विनायकराव थोरात यांच्या नेतृत्वाखाली जवळजवळ प्रत्येक तालुक्यातून लोक आले होते. मावळ तालुक्यातून १२० लोक आले आहेत. तळेगाव-दाभाडे येथील विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष दत्तात्रय विष्णू खोल्लम भेटले. साठीचा हा गृहस्थ 'मंदिर वही बनायेंगे' अशा घोषणा तितक्याच उत्साहाने देत होता.

    झुळझुळीत भगवे कपडे घातलेला एक तरुण पुढे आला. थोरातांनी ओळख करून दिली. हे गुरू श्री महंत रामगिरीचे महाराज. पंचविशीतील त्या तरुणाला नाव विचारले तर म्हणाला सुरेश गिरी. गाव कुठलं असे विचारता बारामती म्हणाला. आपल्या प्रचारानं बारामती हादरून टाकली, असे त्यानं सांगितलं.

    त्यात बजरंग दलाचे तरुण उठून दिसत होते. खांद्यावरून कमरेपर्यंत भगवे पट्टे आणि जय श्रीराम या घोषणा. यात साताऱ्याचा दिलीप जोशी दिसत होता. साताऱ्याहून १२ तरुण आले होते, तर धुळ्याहून ११, नागपूरहून असेच पाचएकशे आले होते.

    थोडक्यात लखनौ स्थानक मराठी माणसांनी फुलून गेलं होतं. हे सगळे 'सियाल्डा एक्स्प्रेस'ने अयोध्येला निघाले होते. रेल्वे स्थानकातील पोलिस सहाय्यता केंद्र विहिंपच्या लोकांनी ताब्यात घेतले होते. तिथं चार पुऱ्या आणि लोणचं यांची पाकिटं वाटण्यात येत होती. तिथं मोठ्ठा बॅनर लावला होता. 'संतोका अब फिर आव्हान. चलो अयोध्या. चलो अयोध्या'.

    गर्दीमधे पेपरवाल्या पोरांची चलती होती. 'बाल ठाकरे बंबईसे अयोध्या जाएंगे'. असे मोठमोठ्याने ओरडून सांगत होते आणि त्यामुळे पहिल्या तासात पेपर खल्लास. मराठी पोरं मोठ्या चवीने 'चेतना' या सायंदैनिकातील ती बातमी वाचत होती.

    ठाकरे हत्यारं आणि बॉम्बच्या लडी घेऊन अयोध्येला जाणार, असं छापलं होतं. याबाबत दिल्लीत मोरेश्वर सावे आणि मोहन रावले या खासदारांनी माहिती दिल्याचे नमूद केले होते. ठाकरे यांच्या बातमीमुळे मराठी मुलांना फारसं आश्चर्य वाटत नव्हतं. पण उत्तर प्रदेशातील विहिंप कार्यकर्ते मात्र मोठ्या थाटात इतरांना सांगताना दिसत होते.

    एक उत्तर भारतीय कार्यकर्ता दुसऱ्याला सांगत होता. अरे बाल ठाकरे को क्या समझे? नयी समझे. अरे वह तो चंबलल के डकैतोसे बढकर है. नही समझे. अब तो नरसिम्हा रावकी छुट्टी हो जाएगी. बम फुटा तो मामलाही खतम. नही समझे? असे सांगून त्याने टाळी घेतली.

    ठाकरे येणार आणि हत्यारांसह येणार या बातमीनं सगळं वातावरण भारावून गेलं होतं. मराठी कारसेवकांत चौकशी केली की किती शिवसैनिक आहेत तर, लोक तोंड फिरवायचे. एकजण म्हणाला, 'ते मोठे लोक आहेत, स्पेशल बस करून येतील.'

    'सियाल्डा एक्स्प्रेस' येण्याची वेळ झाली तसे मराठी कारसेवक घोषणा देत फलाटावर गोळा झाले. बहुजन समाजाच्या या घोळक्यात एखादाच चित्पावन संघीय दिसत होता. दिमाखात.

     

    ३ डिसेंबर १९९२, अयोध्या
    राम रंगी रंगले

    अयोध्या शहरात प्रवेश करतानाच वादग्रस्त विभागाकडे जाणारा राम रस्ता. या रस्त्यावर हजारो कारसेवकांची गर्दी आजुबाजूला उभारण्यात आलेले शेकडो तंबू, सामूहिक स्नान, स्त्री-पुरुष सगळे एका ठिकाणी. सामूहिक भोजन..जागा मिळेल तिथे बसून..ठिकठिकाणी शिधा वाटप केंद्रे. जेवण्याची पाकिटे घेण्यासाठी लागलेली रांग. सर्वांना जेवण मिळेल याची खात्री नाही. तरीही रांगा हटत नाही.

    राम मार्गावर कारसेवकांची गर्दी. पुरुष बायका, मध्यमवयीन, तरुण, उतार वयाकडे झुकलेले सगळेच त्या गर्दीत. जय सियाराम च्या घोषणा. भगवी जाकिटे, भगव्या टोप्या, भगव्या रिबीनी, भगवी मुंडासी, भगव्या ओढण्या, भगवे झेंडे यांनी सगळा परिसर भगवा बनलेला. गर्दीत महाराष्ट्रीय, आंध्रचे, तामिळनाडूचे, गुजराथेतील, राजस्थानमधील सगळे चेहरे ओळखायला येतात.

    गर्दीतच चार-पाचशे तरुणांचा घोळका राम नाम सत्य है ही घोषणा देत पुढे येतो. पंतप्रधान पी.व्ही. नरसिंह राव यांची प्रतिकात्मक प्रेतयात्रा निघालेली असते. काठीला चपला अडकवून त्या दाखविल्या जातात. मागच्या बाजूला चौघांच्या खांद्यावर ताटी आणि त्यावर मढ्याची प्रतिकृती. घोषणा, राम नाम सत्य है. नरसिंह राव मुर्दाबाद इत्यादी-इत्यादी.

    राम चबुतऱ्यापुढं सभा. तेथे प्रचंड गर्दी. राम कथा कुंजमधे स्वागत कक्ष. धावपळ. गडबड. आणि गोंधळ. राम चौथऱ्यापुढे चाललेल्या सभेचे ध्वनिक्षेपक पार रस्त्यापर्यंत शेकडो कर्णे आणि भाषणाच्या आवाजाने सगळ्या परिसरात नुसता गोंगाट. खासदार उमा भारती यांच भाषण. मंदिर तो जरुर बनेगा. मगर कलंकका यह ढाचा खत्म होना चाहिए. टाळ्या. शिट्या. आणि जय श्रीरामाच्या घोषणा. सौगंध राम की खाते है, मंदिर वही बनाएंगे. नुस्ता जल्लोश. पुन्हा त्या सांगतात. जोश पर होश रखो. समजावणीचा स्वर. सभा संपते.

    पुन्हा गर्दी पुरासारखी वाढू लागते. त्याच घोषणा. तोच गोंधळ. तोच जोश आणि तोच उत्साह. राम चबुतऱ्याकडे जाताना एक मोठा बॅनर. दुनियाकी कोई भी ताकद राम मंदिर को रोक नहीं सकती. पुढे आणखी एक मोठा बॅनर बंदुकों से हम न डरेंगे, मौत हमारी हमजोली, जान हथेली पर ले देंगे. प्राण देंगे, मंदिर का निर्माण करेंगे. राम का दरबारी हमारा कोर्ट और धर्मसंसद हमारी सरकार.

    विवाद्य बाबरी मशिदीभोवती भरभक्कम कुंपण. कुंपणाभोवती राज्य राखीव पोलिसांचा पहारा.त्या पहाऱ्यापुढे तरुणांचा भांगडा. परत निघताना एक चित्रविचित्र तरुण भेटला. सगळे डोके वस्तऱ्याने तासलेले. फक्त राम ही अक्षरे डोक्यावर कोरलेली. तेवढेच केस. हा तरुण पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्याचा. माजी गृहराज्यमंत्री बापूसाहेब थिटे यांच्या गावचा. नाव संभाजी पराड.

    अयोध्या गावात घराघरात मंदिर. प्रत्येक मंदिरावर माकडांच्या टोळ्या. रस्त्यावर ही माणसं. जागोजाग लाऊड स्पीकर. रामाची गाणी. राम जी का मंदिर बनानेवाला आया है. रामा रामा, रामा रामा, रामा रामा, रामा रामा. पुढे कुठे जय राम जन्मभूमी हे गाणे. त्या गाणाच्या तालावर नाचणारी पोरं आणि फेर धरलेल्या पोरी.

    प्रत्येक दुकानात भगवे स्कार्फ, भगव्या रिबीनी, ओढण्या बाहेर अडकवलेल्या. त्यांची विक्रीही जोरात. कुणाचा धंदा दहापट तर कुणाचा वीसपट. दुकानात पंढरपूरसारखे कुंकू, गुलाल, भस्म, माळा, देवादिकांच्या तसबीरी. उदबत्त्या. रामाच्या कॅसेट आणि कॅलेंडर्स. जिकडे पाहावे तिकडे राम.

    टुटेगी, झुकेगी दिल्ली सरकार झुकेगी, ही घोषणा देणाऱ्या विद्यार्थी परिषदेच्या मुली. मधेच बोला पुंडलिक वरदा हारी विठ्ठल. जिकडे तिकडे महाराष्ट्रातील आणि त्याहीपेक्षा आंध्रातील लोक जास्त. पंतप्रधान आंध्रचे म्हणून भाजपने ताकद लावून आंध्रातून आणलेले लोक दिसतात. पुल्ला रेड्डी नावाचे आंध्रातील विहिंपचे अध्यक्ष. मिठाईवाले. त्यांची मिठाई आंध्रातील मशहूर आहे. पंतप्रधानाच्या नंद्याल या मतदारसंघातून एक हजार कारसेवक. आंध्रातून एकूण १५ हजार. महाराष्ट्रातून १० हजार. तामिळनाडू, केरळ या राज्यांतील थोडेबहुत पण कारसेवकात दाक्षिणात्यांचं वर्चस्व दिसून येतं. उत्तर प्रदेशातील कारसेवक जवळजवळ दिसत नव्हते, हेही विशेष.

    कारसेवकांची गर्दी दरदिवस वाढते आहे. जेवणखाण, आंघोळ, संडास यांची आबाळ होताना दिसत असतानाही उत्साहात कोठेही कमी नाही. शिवाजीनगर, राणी लक्ष्मीबाईनगर, गुरुगोविंदनगर, कारसेवापुरम ही तंबूची नगरं वसलेली. त्यात हजारो तंबू, त्यात कारसेवकांच्या वस्त्या. अंगाला राख फासलेले साधू संत महंत निर्मोचन घाट, वाल्मिकी आश्रम, भगोदाचार आश्रम येथे वसती करुन आहेत. तर विष्णू हरी दालमिया, बद्रीप्रसाद तोष्णीवाल या विहिंप नेत्यांचा मुक्काम जानकी महल ट्रस्टच्या आलिशान वास्तूत.

    ४ डिसेंबर १९९२, अयोध्या
    कारसेवा होती हैं, करानेवाला चाहिए

    कचेहरी मैदान फैजाबाद, काँग्रेसचा तिरंगी झेंडा लावलेल्या मोटारी निघालेल्या असतात. ‘जय सीयाराम’च्या घोषणा सुरू असताना मधेच या मोटारी पाहून अनेकांच्या चेहऱ्यावर कुतुहल. अयोध्येत कारसेवकांना जागा न उरल्याने आता अनेकजण फैजाबादेत मिळेल तेथे आश्रय धुंडाळताना दिसत आहेत. त्यामुळे फैजाबादेत रस्तोरस्ती आता गर्दी झाली आहे. तमाम हॉटेलांबाहेर ‘हाऊसफुल्ल’चा बोर्ड.

    काँग्रेसने आज ‘शांतता मार्च’ जाहीर केलेला असतो. कचेहरी मैदानाकडे वाहने निघालेली असतात. कचेहरी म्हणजे कचेरी. जिल्हाधिका-यांची, जिल्हा न्यायाधीशांची. आवारात फैजाबाद बार असोसिएशन. कुठल्याही मंडईत जसे कट्टे असतात तसे कट्टे. वर पत्र्याची शेड. या कट्ट्यावर वकिलांचे बाकडे. बाकड्यावर पेटी. पेटीशेजारी वकील. भाजीवाले बसतात तसे फैजाबादेत वकील बसतात.

    तर या कचेरीच्या मैदानात काँग्रेसवाले जमत असतात. गोगलगाईच्या गतीने त्यांची संख्या वाढत असते. मैदानात रामधून लावलेली असते. ‘रघुपती राघव राजाराम पतित पावन सीताराम’, ‘सीताराम सीताराम भज प्यारे तू सीताराम’. भाजप आणि रा. स्व. संघ यांनी कब्जा न केल्यामुळे हे एक गाणे काँग्रेसवाल्यांकरिता उरलं आहे. ‘जय श्रीराम’ आणि ‘रामा रामा हो रामा रामा’ यांच्या पार्श्वभूमीवर हे गाणं काही वेगळ्याच भावना जागवून जाते. शांतता मार्चसाठी खास दिल्लीतून नेतेमंडळी येणार म्हणून स्थानिक नेते तयारीत असतात. लोक जमविण्यासाठी आटापिटा चाललेला दिसतो. मार्च निघाला तरी मैदानाबाहेरच तो अडविण्याचा निर्णय झालेला असतो.

    मैदानात बॅनर्स ‘धर्म संसदसे यही इच्छा, संविधान न्यायालय की करे रक्षा’, ‘सारे जहाँसे अच्छा’ वगैरे वगैरे. फैजाबाद म्हणजे आचार्य नरेंद्र देव यांचं गाव. त्यांच्या जवळच्या नात्यातले एक निर्मल खत्री इथले खासदार. त्यांनी एक मोठा फलक लावलेला असतो. ‘राम के मर्यादाकी यह भूमी, लोहिया - नरेंद्र देवकी यह नगरी, अमन चैनकी हैं यह नगरी.’

    अयोध्या आणि फैजाबादेतील या वातावरणात काँग्रेसचा मार्च धर्मसंसदेवर जाणार असतो. पोलिसांनी परवानगी नाकारली. नाकारणे भाग होते. ‘दर्या में खसखस’ अशी त्यांची अवस्था होती.

    तिकडे अयोध्येत रस्तोरस्ती ‘रामा रामा हो रामा रामा’ तर इकडे मंदिर वही बनायेंगेच्या ठेक्यात, बजरंग दलाची पितळी त्रिशूळ, गिरगावातल्या मुलांची स्टीलची फरशी, कुणाचा धनुष्यबाण मिरवणुकीत नाचत असतो. त्याच गराड्यात सोलापूरचे वसंत पतंगे आणि जालन्याचे वारकरी कारसेवक दिसतात. सोबत बाया बापड्या सोलापूर, परभणी, जळगाव, जालना, पुणे, परळी अशी कित्येक मराठी माणसं. त्यात आमगाचे प्राध्यापक विवेक जोशी विद्यार्थ्याना घेऊन आलेले दिसतात. ‘श्रीरामाचे नाव घेता, नरसिंह लागला पळायला, रामा रामा हो रामा रामा’, ‘जाग उठे जब राणा शिवाजी, भाग पडे मुल्ला काझी’, ‘वी. पी. सिंग मर गया, जलानेवाला चाहिए’, ‘कारसेवा होती है, करानेवाला चाहिए’, असे प्रकार अखंडपणे रस्तोरस्ती चालू आहेत. दुसरं कामच नाही. दशरथ महल, राम भरत मिलाप मंदिर, हनुमान गढी, सगळीकडे तुफानी रांगा.

    शिवसैनिकांचा एक जथ्था अयोध्येत दाखल झाला आहे. बहुतेक मराठवाड्यातील. शिवसैनिकांबद्धल इथे प्रचंड कुतुहल आहे. ते काहीतरी गडबड करणार, अशी चर्चा कारसेवकांत आहे. शिवसैनिक इथं काही करणार नाहीत, असं सांगूनही खरं वाटत नाही. लोकांच्या मते संघवाल्यांनीच ही कंडी पिकवली आहे. बजरंग दलाच्या लोकांनी करायचे आणि शिवसैनिकांवर घालायचे, असा डाव असल्याचं सांगतात.

    तर अशोक सिंघल, यांची वार्ताहर बैठक, खासदार उमा भारती भगव्या वैशात. डोक्यावरचे केस पार कापलेले. सिंघल कारसेवेचा तपशील सांगत नाहीत. कारसेवकांकडे चौकशी केली तर मधेच एखादा संघवाला तंबी देतो. किसी को कुछ बताना नही. लगेच सगळे पांगतात. संघाची पकड जबरदस्त. त्यामुळे जे होईल ते ठरवूनच!

    आतल्या गोटातील बातमीनुसार कारसेवकांचा पहिला जथ्था आंध्र प्रदेशातील असेल. आंध्रातील लोक इतरांच्या मानाने शांत, भोळेभाबडे. सगळ्यात आक्रमक महाराष्ट्रातील कारसेवक. खास पठडीत तयार झाल्यामुळे. रामाच्या भक्तीपोटी मोठ्या संख्येने आलेले आंध्रातील कारसेवक आघाडीला ठेवण्याचे कारण उघड आहे. संघाच्या डावपेचाचा हा खास नमुना.

    कारसेवा ६ तारखेला आहे. तूर्तास नुस्ती जत्रा, हुर्रेहूर पंढरपूर.

    ५ डिसेंबर १९९२, अयोध्या
    व्यापाऱ्यांची चंगळ


    अयोध्येत ६ डिसेंबरला काय होणार, या उत्सुकतेने लाखो कारसेवकांना गेला आठवडाभर भंडावून सोडलं होते. या खेपेची कारसेवा म्हणजे ती ‘कलंकित’ वास्तू जमीनदोस्त करण्याची निर्णायक कारसेवा, असे समीकरण मनाशी बांधून अनेकजण आले होते. त्यामुळे ‘रणचंडीको नरमुंडो की माला पहनायेंगे, खायी थी जो कसम उसे पूरा कर दिखलाऐंगे, आगे कदम बढाया है, अब पीछे नही हटेंगे’ ही घोषणा ठिकठिकाणी लिहिण्यात आली होती.

    ‘रामजीका काम ये है रामजीका’ असं म्हणत महिलाही हीच खूणगाठ बांधून आल्या आहेत. ‘सियावर रामचंद्र की जय’, या घोषणा देत तरुणांनी घसे मोकळे केले. कोणी डोक्याची चक्की केली, तर कोणी ‘राम’ ही अक्षरंही डोक्यावर कोरली. कारसेवकांच्या उदंड उत्साहाने अयोध्या-फैजाबाद फुलून गेले होते. ही दोन शहरं म्हणजे जणू मिरज-सांगलीच. तेवढंच अंतर, तो रस्ताही गजबजून गेला आहे. या दोन्ही शहरांत अहोरात्र वाहतूक आहे. मिळेल त्या वाहनाने अथवा पायी देखील!

    एकूण दोन लाख कारसेवक आजमितीला या दोन शहरांत आहेत. शिवाय पोलिस. राज्याचे आणि केंद्राचे. केंद्राचे पोलिस दूर दृष्टी पथात न येणारे. केंद्र सरकारच्या जागा जिथे आहेत, तिथं त्यांचा मुक्काम, अन्नधान्य बरोबरंच आणले आहे. पाण्यासाठी स्वतःच्या बोअर लावल्या. स्वतःचे मोबाईल टेलिफोन एक्सचेंज आणले. राज्य सरकारकडून कसलीच अपोक्षा न ठेवता स्वतःची व्यवस्था त्यांनी स्वतः केली आहे. 

    केंद्रीय राखीव पोलिस फक्त बाजारातून भाजी विकत घेतात. दोन लाख कारसेवक आणि सीआरपी यांच्यामुळे भाज्यांचे दर वाढलेत. चाळीस पैशाची भाजी तब्बल चार रुपये किलोने विकली जात आहे. अयोध्येतील कळकट हॉटेलात एक भजा एक रुपयाला विकला जात आहे. एकंदरीत व्यापाऱ्यांची चंगळ आहे. मंदिरात बऱ्यापैकी माया जमत आहे.

    अयोध्येत जिकडे पाहावे तिकडे पत्रावळी दिसत आहेत. द्रोण आणि पत्रावळ्या चाटणारी माकडे पाहताना कसेसेच होते. पण ती मात्र खुशीत आहेत. रिक्षावाले, टॅक्सीवाले, दुकानदार, पुजारी, हॉटेल मालक या सगळ्यांना या आठवड्यात लाभ होता. प्रभू रामचंद्राच्या भूमीचे दर्शन झाल्यामुळे कारसेवक महिला पुरुषही आनंदात आहेत ते वेगळंच.

    ‘राम की धरती, रामका भारत, यही हमारी अदालत’ अशा घोषणा दिल्या जात असताना, भांगडा आणि डिस्को करताना कारसेवा कशी होणार असा प्रश्न सर्वांना भंडावत होता. अगदी आल्या दिवसापासून. आज विश्व हिंदू परिषदेच्या मार्गदर्शक मंडळात याबाबत निर्णय होणार होता. त्यामुळे कमालीची उत्सुकता होती. अगदी तुळजापूर तालुक्यातून इरकली लुगडी नेसलेल्या बायांनाही! महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक येथून आलेल्या कारसेवकांची संख्या पाहून विद्यमान राज्यकर्त्यांना घाम फुटावा, अशी स्थिती आहे.

    तर मार्गदर्शक मंडळाची बैठक हनुमान बागेत चालली होती. अयोध्येत राम, लक्ष्मण, सीतामैया, लवकुश, हनुमान, रामायण अशीच नावे प्रत्येक ठिकाणाला आहेत. इथे एकही इमारत अशी नाही की जिच्यावर प्रभू रामचंद्राचं चित्र नाही. इकडे रामकथा कुंज येथील ध्वनिक्षेपकावरून सक्त सूचना देण्यात येत होत्या. राम मार्गावर कारसेवकांच्या रांगा लावण्यात आल्या होत्या. प्रांताप्रमाणे उद्याच्या कारसेवेची ही रंगीत तालीम आहे, असं सांगण्यात येत होतं.

    अगदी सुरूवातीला आंध्र प्रदेशातील कारसेवक, त्यातही पंतप्रधान पी. वी. नरसिंह राव यांच्या नांद्याल या लोकसभा मतदारसंघातील. नरसिंह राव यांचे आजोळ वंगारा हे गाव. तिथली दहा मुलं तर अगदी पहिल्या रांगेत. मंडल श्रीनिवास हा विद्यार्थी त्यांचं नेतृत्व करीत होता.

    आंध्रातून मोठ्या संख्येने कारसेवक आलेले. त्यांना विचारलं उद्या कारसेवा कशी करणार. सर्वाचं एकच म्हणणं जसा आदेश दिला जाईल तशी. आंध्र प्रदेशनंतर महाराष्ट्राच्या जथ्था. महाराष्ट्राच्या कारसेवकांवर संघाचे जबर वर्चस्व. कोणी काहीही विचारायला जा. ठराविक साचेबंद उत्तर. विदर्भ आणि मराठवाड्यातील लोक काही बोलायला गेले तर अर्धी चड्डीवाला हजर. प्रश्न मिटला. महाराष्ट्रानंतर राजस्थान, पंजाब, कर्नाटक, मध्य प्रदेश अशा रांगा लागलेल्या. सर्वात शेवटी उत्तर प्रदेश आणि बिहार.

    जथ्थे चालले होते. रामलल्ला हम आये है. त्याचवेळी ध्वनिक्षेपकांच्या संस्कृत प्रचुर आणि मराठी धाटणीच्या विशुद्ध हिंदीतून सूचना चालल्या होत्या. उद्या सकाळी ठीक ११ वाजता याच पद्धतीने जमायचे. प्रत्येक कारसेवक आपल्या मुठीत माती घेईल. ती माती टाकून त्याने कारसेवा पूर्ण करावयाची. यावेळी अनुशासन राखले जाईल. जराही गडबड अपेक्षित नाही. वगैरे. वगैरे.

    सूचना ऐकताच उत्तर प्रदेश, बिहार आणि राजस्थानच्या कारसेवकांची माथी भडकतात. हम थोडेही मिट्टी डालनेको आये है? हमे तो यह कलंक का ढाचा खत्म करना है. यह कौन है निर्णय करानेवाले. ढांचेको नोंचने नहीं दिया, तो रास्ते रास्ते मे आग लगायेंगे. यह तो कल्याण सिंग को बचाने का तरीका है. हम तो राम के आदेश का पालन करेंगे. यह कौन होते है हमे आदेश देनेवाले.

    राजस्थानातील तरुण भडकलेले असतात. पाठोपाठ बिहारचे तरुण घोळक्याने अद्वातद्वा बोलत असतात. यह कारसेवा थोडीही है. यह तो नाटक है. नेतागिरी करने के बजाय नौटंकी बजाव. इ. इ. बिहारमधील तरुण शांतपणे बडबडत असतात. स्वयंसेवक भणभणत असतात.

    हमारा यह जुनून देखकरही हमे कतारमे पीछे खडा किया जा रहा है, असंही बिहारी राजस्थानी तरुण सांगत होते. भाजपवाल्यांची ही चालबाजी आम्ही चांगली ओळखतो, असे त्यांचं म्हणणं. रामलल्लाची घोषणा देत जथ्थे पुढे झाले. वादग्रस्त जागेत गेले आणि तिथून रांगेतून बाहेर. आपापल्या वसाहतीत. संपले.

    वादग्रस्त बाबरी मशिदीच्या बाहेर एक मोठं कुंपण आहे. अलीकडे मुलायम सिंगांच्या सरकारने आणखी एक कुंपण घातलं आहे. त्याच्याही बाहेर आता कल्याणसिंग यांच्या सरकारने लाकडी कुंपण उभं केलं आहे. लाकडी कुंपणाच्या आत राज्याचे पोलिस. कुंपणाबाहेर संघाचे स्वयंसेवक. त्यामुळे उद्याच्या अनुशासनाची पूर्ण तयारी झाली आहे.

    जथ्थे ‘रिहर्सल’ करत असताना तिकडे वेदमंदिरात अशोक सिंघल, आचार्य वासुदेव यांची वार्ताहर बैठक चालू असते. न्यायालय, केंद्र सरकार यांच्यावर भरपूर आणि खरपूस टीका चालली होती. न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे उद्याची कारसेवा नाही, असं ते वारंवार सांगत होते. वार्ताहर प्रश्नांचा भडीमार करताना ते चिडत होते.

    एक मात्र निश्चित की उद्या कारसेवाही होणार आणि न्यायालयाच्या निर्णयाचे पालनही? गडबड करणारे फार गडबड करतील अशी शक्यता दिसत नाही, आजतर. कारण असे गाजर दिले आहे की, जे खाताही येईल आणि नंतर पुंगी करुन वाजवताही येईल! असो.


    ६ डिसेंबर १९९२, अयोध्या
    अखेर ते घडलंच

    राम रस्त्यावर सकाळी ८.३० पासून लागलेल्या रांगा प्रथम आंध्र, नंतर महाराष्ट्र वगैरे वगैरे परिसरात सुमारे दीड दोन लाख कारसेवक बसलेले. 'राम कथा कुंजा'च्या गच्चीवरून ध्वनिक्षेपकाद्वारे सूचना चाललेल्या असतात. शांततेनं कारसेवा करा, अनुशासन पाळा, काही लोकं माथी भडकावतील, पण शांतता राखा.

    अशोक सिंघल बोलण्यास उभे राहतात. 'आम्ही सर्व हिंदू एक आहोत. आमच्यात मतभेद नाहीत. ही पत्रकार मंडळी खोटंनाटं लिहितात. त्यांना योग्य तो जबाब द्या' या आघातात बीबीसीचा उद्धार.

    वादग्रस्त २.७७ एकर जागेत, शिलान्यास झालेल्या ठिकाणी झेंडा फडकावलेला असतो. राज्याचे पोलिस चहुबाजुंनी तैनात. त्यांच्यापुढे संघाचे स्वयंसेवक, क्षणाक्षणाला उत्साहाचं उधाण येत असते. 'सियावर रामचंद्र की जय' वगैरे. सकाळी ठीक ९.५५ वा. साधूसंतांना राम चबुतऱ्यावर सोडण्यात येतं. शंखध्वनी साऱ्या आसमंतात घुमतो.

    याच वेळी सशस्त्र पोलिसांसह जिल्हा दंडाधिकारी श्रीवास्तव पाहणीसाठी चबुतऱ्यावर येतात. रामनामाच्या घोषणा. आजूबाजूया सर्व इमारती झाडांवर बघे कारसेवक. चबुतऱ्यावर ३०० ते ४०० साधू जमतात. साधू संत आज चबुतरा धुणार होते. पण त्यासाठी आधी ठरल्याप्रमाणे शरयू नदीतून पाणीही आणलेलं दिसत नव्हतं. 'राममंदिर के नींव पर (शिलान्यास) मिट्टी डालनी है', असं सांगून आजच्या कारसेवेत सर्वांचं समाधान होईल, हे आम्ही पाहू. पण तुम्ही संयम राखा. १० वाजून २० मिनिटांनी लालकृष्ण अडवाणी राम चबुतऱ्यावर येतात. बरोबर मुरली मनोहर जोशी, प्रमोद महाजन. कारसेवकांमार्फत प्रचंड स्वागत. दोघे नेते पाहणी करतात. एवढ्यात जोशींना ठेच लागते. अंगठ्याचे नख निघतं. तसे ते बाहेर निघतात.

    एवढ्यात दक्षिणेच्या दरवाजातून काही कारसेवक कडं तोडून आत घुसतात. आगंतुकपणे. घोषणांचा धुमाकूळ. संघ स्वयंसेवक त्यांना अडवतात. थोडी हाणामारी. थोड्या वेळाने आणखी काही तसेच घुसतात. अडवाणी त्यांनी शांत करण्याऐवजी तसेच निघून जातात. घुसखोरांचा पत्रकार आणि छायाचित्रकार यांच्यापुढे नाच सुरू होतो. साधूसंत दोन्हीकडून नाच पाहतात.

    'राम कथा कुंज'च्या गच्चीवरून अडवाणी भाषण करण्यास उभे राहतात. 'अब दुनिया की कोई ताकद राममंदिर को रोक नही सकती', अडथळे आणले तर केंद्रात सरकार चालू देणार नाही. 'जो शहीद होने आये है, उन्हे शहीद होने दो. रामचरण मे जाना अगर उनके भाग में होगा, तो उन्हे शहीद होने दो'.  भाषा आक्रमक. प्रक्षोभक. त्यांच्या प्रत्येक वाक्याला कारसेवकांची दाद.

    रा. स्व. संघाच्या आत्मघातकी पथकाने राम चबुतऱ्यावर प्रवेश केलेला असतो. काही घुसखोरांना बाहेर काढलं जातं. हाणामाऱ्या नि बाचाबाची. काही साधू आया बहिणीवरून शिव्या घालतात. एक साधू 'वॉइस ऑफ अमेरिका'च्या वार्ताहराला मारहाण करतो. 'टाइम' मॅगझीनच्या वार्ताहरही यातून सुटत नाहीत. शिव्यांच्या लाखोलीत पाच पंचवीस छायाचित्रकारांचे कॅमेरे हिसकावून घेतले जातात. काही काँक्रीटवर आदळले जातात, तर काही पळवले जातात. आरडाओरडा, गोंधळ. 

    सिंघल येतात. निघून जातात. या गोंधळात अडवाणी आपले कमांडर शोधू लागतात. 'मेरे कमांडर किधर है', अशी चौकशी करतात. प्रचंड हादरलेले असतात. गडबड, गोंधळ सुरूच. प्रभू रामचंद्रांनी संयम पाळला म्हणूनच धनुष्य तोडलं. हा ढाचाही तसाच तुटेल. कारण तोपर्यंत साधूसंत शांत होणार नाहीत. माईकवरून कुणाचं तरी भाषण सुरू असतं. गडबड वाढते.

    ११ वाजून ५० मिनिटं. मशिदीवर पहिला दगड पडतो. पाठोपाठ चहूबाजूंनी दगडाचा वर्षाव. राज्य सरकारच्या सांगण्यावरून मशिदीत केंद्रीय राखीव पोलिसांची तुकडी तैनात असते. या दगडफेकीत हे ७-८ पोलिस घायाळ. तेवढ्यात काही घुसखोर कुंपणावरून मशिदीत घुसतात. घुमटावर चढतात. हजारो कारसेवक उन्मादाने नाचू लागतात. दगडफेकीला आणखीनच जोर चढतो. माईकवरून सूचना सुरू होतत. कोई भी पुलिस हस्तक्षेप करेगा नही. 'पुलिस को अनुरोध है के वो किसी भी हालत मे हस्तक्षेप ना करे'. कारसेवकांवर दगड फेकू नका. कारण आपलेच कारसेवक जखमी होत आहेत.

    पोलिस स्वस्थपणे पाहात आहेत. तेवढ्यात आणखी शेकडो कारसेवक कुंपणावरून आत शिरतात. सीआरपीचे डीआयजी ओ. पी. मलिक यांना दगड लागतो. कारसेवक मशिदीत घुसतात. गर्भगृहात जेथे रामाची मूर्ती ठेवली आहे, तेथे विनयकुमार पांडे नावाचा पुजाऱ्याचा मुलगा बसलेला असतो. संतप्त कारसेवक त्याला मारहाण करून मूर्ती बाजूला ठेवतात. मूर्तीचे मुकूट आणि सोन्याचांदीचे दागिने पळवले जातात. घायाळ सीआरपी त्या मुलास घेऊन नियंत्रण कक्षात येतात.

    मिळेल त्या हत्याराने, साधनाने घुमटांची खुदाई सुरू होते. शंखध्वनी, टाळ्या, घोषणा आणि तोडफोड. यात बाहेरची भिंत पडते. तसा टाळ्यांचा कडकडाट. मशिदीचा ताबा पूर्णपणे कारसेवक आणि साधूंकडे. सगळे पोलिस एका बाजुला होतात. जिल्हा दंडाधिकारी ज्येष्ठ पोलिस अधिकारी हे दृश्य जवळच्या नियंत्रण कक्षात बसून स्वस्थपणे पाहत असतात. जमावात आता ढोलकी, टाळ, ताशा वगैरे. लोक विजयी मुद्रेने मशिदीच्या विटा, सळ्या वाजतगाजत नेत असतात. एव्हाना १५ ते २० कारसेवक जखमी. ५० ते ६० पत्रकार-छायचित्रकारांना मारहाण. यातून बीबीसीचे मार्क टुलीही सुटत नाहीत. ६० ते ७० कॅमेरे लंपास. 

    'सारे रोड ब्लॉक किये जाय. सीआरपी की एकी भी गाडी अंदर आ न सके.' २ वाजून ४० मिनिटांनी घुमटाची एक भिंत कोसळते. २ वाजून ५० मिनिटांनी घुमट जमीनदोस्त. माईकवर आता ऋतंभरा येतात. 'कलंक का ये ढाचा खत्म करो. राम नाम सत्य है. बाबरी मशीद तोड दे.' ऋतंभरा म्हणत, 'एक धक्का और दो'. कारसेवक म्हणतात, 'बाबरी मशीद तोड दो.'

    ४ वाजता आणखी एक घुमट जमीनदोस्त. त्यात अनेक कारसेवक जखमी. त्यांची जागा तिसरी तुकडी घेते. सर्वत्र जल्लोष आणि घोषणा. जिल्हा दंडाधिकारी आणि इतर नुस्ते पाहतात. बरोबर ४ वाजून ४६ मिनिटांनी मधला घुमट खाली येतो. लाखो कारसेवक आनंदाने नाचत असतात. 

    'कलंक का ढाचा खत्म हुआ', राज्याचे पोलिस एकमेकांना टाळ्या देत असतात. साध्वी ऋतंभरा जोराजोरात अभिनंदन करत असतात. कारसेवकांच्या रांगा रेल्वे स्टेशनकडे. प्रत्येक जण बरोबर जाताना मशिदीच्या दगड विटांसह दिसतो. वार्ताहर छायाचित्रकार पोलिसांच्या ट्रकमधून कसेबसे फैजाबादेत. तिथे कर्फ्यू. तिथले लोक म्हणतात, आखिर बीजेपीने ढाचा खत्म तो किया. सर्वत्र बीजेपीचे कौतुक. कर्फ्यूतही रस्त्यावर वर्दळ. चर्चा. एव्हाना अडवाणी जोशी कधीच गायब झालेले असतात.

    ७ डिसेंबर १९९२, अयोध्या
    कारसेवकांचं राज्य

    उत्तर प्रदेशात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर अनेक शहरांत संचारबदी. फैजाबादेत सहा डिसेंबरच्या रात्री काही ठिकाणी जाळपोळ. रस्त्यावर शुकशुकाट. कारसेवक जथ्थ्या जथ्थ्याने निघालेले. परतीच्या वाटेत घोषणा ऐकायला मिळत नाहीत. जो तो शांतपणे निघालेला. संचारबंदी असली तरी फारशी कठोर नाही. त्यामुळे घराच्या दाराबाहेर पेपर वाचत चर्चा चाललेली मिळते.

    कल्याणसिंगने सही वक्त पर इस्तीफा दे दिया. अब तो नरसिंहा राव को भी जाना पडेगा. अच्छा हुवा बरसोंका कलंक मिट गया. बीजेपी तो अब सेंटरमे जायेगा. कोई उसे रोक नही पायेगा. एकंदर लोक भाजपवर एकदम खूष. वी. पी. सिंग आणि नरसिंह राव या दोघांनाही शिव्याशाप. राज्याचे पोलिसही वर्तमानपत्र वाचत चर्चा करताना दिसतात. सूर एकच. बीजेपीने बडा अच्छा काम किया. सर्वत्र टीका होत असताना जनमत भाजपबरोबर.

    अयोध्येच्या वाटेवर जाताना फैजाबादेत झालेली जाळपोळ दिसते. फैजाबादची हद्द संपातच अयोध्येची हद्द सुरू होते. कारसेवक मोठ्या प्रमाणात रेल्वे स्थानकाकडे निघालेले असतात. प्रत्येकाच्या हातात कारसेवेची खूणगाठ म्हणून वीट, सळई इत्यादी वस्तू. बाबरी मशीद पाडल्यानंतर मिळलेल्या चीजा. मधूनमधून सीयारामच्या घोषणा.

    अयोध्येत शिरताच ठिकठिकाणी धुराचे लोट आकाशाकडे झेपावताना दिसतात. घरांना, दुकानांना आगी लावण्याचा कार्यक्रम जोरात सुरू असतो. हा कार्यक्रम रात्रीपासून असल्याने एव्हाना ६०-७० घरं भस्मसात झालेली असतात. कारसेवक उत्साहाने उरलेली कारसेवा करताना दिसत असतात. स्थानिक लोक घरं दाखवतात आणि कारसेवक आगी लावतात, असं चित्र. स्थानिक पोलिस कोंडाळी करून प्रत्येक घटना कुतुहलाने पाहताना दिसतात. घर अथवा दुकान फुटलं की लोक आत घुसून लूटमार करतात. यात स्थानिक पोलिसही हाताला लागेल ते घेऊन बाजुला होतात. कारसेवक चुकून एका हिंदूच्या बंद घरावर हल्ला करतात. लोक सांगतात, 'इधर नहीं भाइं उधर'. मोर्चा तिकडे वळतो. असे प्रकार अयोध्येत ठिकठिकाणी चालू असतात.

    स्थानिक अधिकाऱ्यांना विचारलं असता ते म्हणतात, `हम क्या करें, हमें काई आदेश नहीं. डीएम फैजाबाद जा बैठे है.` बाबरी मशिदीजवळ जोरात कारसेवा चाललेली असते. एव्हाना मशीद पूर्णपणे साफ झालेली असते. बायका पुरुष उत्साहाने माती, दगड, विटा दूरवर टाकताना दिसतात. विश्व हिंदू परिषदेच्या माईकवरून सूचना चाललेल्या असतात. ज्यांना काल कारसेवेत भाग घेता आला नाही, त्यांनी आज कारसेवा करुनच निघावे. पवित्र कार्यात मागे राहू नका. इ. इ.

    इतक्यात आकाशात हेलिकॉप्टर घिरट्या घालू लागलेत. उद्ध्वस्त बाबरी मशिदीजवळ पाचपन्नास हजारांचा जमाव 'जय सीयाराम'च्या घोषणा देतो. हेलिकॉप्टर बीएसएफ अथवा लष्कराचं असावं. अयोध्येची हवाई पाहणी चालू असते. बाबरी मशीद चली गयी, अब नरसिंह राव चला जायेगा, जोरदार घोषणा. उत्तर प्रदेशात राष्ट्रपती राजवट लागू झाली असली तरी अयोध्येत कारसेवकांचेच राज्य सुरू असतं.

    मशिदीची जागा साफ करुन तिथे रामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्याचा कार्यक्रम चालू असतो. तात्पुरती जागा सारवून त्यावर मूर्ती ठेवल्या जात असतात. राम मूर्तीची प्रतिष्ठापना झाल्याशिवाय डीएम म्हणजे जिल्हा दंडाधिकारी सीआरपींना बोलावणार नाहीत, अशी जोरदार चर्चा. तिकडे रामकथा कुंजच्या गच्चीवरुन भाषणं चालू असतात. हजारोंच्या संख्येने कारसेवक ती भाषणं ऐकत असतात. अब महाराष्ट्र के भूतपूर्व विरोधी पक्ष नेता मनोहर जोशी साहब भाषण करेंगे. जोशी मोठ्या जोशात बोलत असतात. सहा डिसेंबर हा हिंदूच्या इतिहासातील एक सुवर्ण दिन म्हणून नोंद होईल. इ. इ.

    फैजाबादकडे जाणाऱ्या रस्त्यावर ठिकठिकाणी वखारी पेटलेल्या असतात. उरल्यासुरल्या मशिदी फोडण्याचं काम सुरू असतं. धुराचे लोळ आकाशाकडे झेपावत असतात. विहिंपच्या नेत्यांच्या मोटारीचा ताफा निघालेला असतो. पुढे एस्कॉर्ट, मागे एस्कॅर्ट. आचार्य गिरीराज किशोर एका मोटारीतून आग पहात जात असतात. जय सीयारामच्या घोषणेने त्यांना निरोप देण्यात येत असतो.

    थोड्या वेळाने शिवसेना नेत्यांच्या मोटारी निघतात. मनोहर जोशी, सुधीर जोशी, दत्ता नलावडे, लीलाधर डाके, आनंद दिघे फैजाबादकडे मार्गस्थ होतात. जाळपोळ आणि लुटालूट चालूच असते. पोलिस मजा पाहत असतात आणि हेलिकॉप्टर आकाशात घिरट्या घालत असतं. अजूनही केंद्र सरकार आकाशातच असतं.

    ८ डिसेंबर १९९२, अयोध्या
    शेवट!

    अयोध्येत ८ डिसेंबरला पहाटे साडेतीन-चारचा सुमार. बाबरी मशिदीच्या जागेवर चोहोबाजूने पाच फुटी भिंत. आत चौथरा, चौथऱ्यावर राम, लक्ष्मण आणि सीतेच्या मूर्ती विराजमान झालेल्या असतात. पाच पन्नास उत्साही कारसेवक परिसरात गप्पा मारत बसलेले असतात काळोख आणि थंडी. केंद्रीय राखीव पोलिसांचा रॅपिड अॅक्शन फोर्स काळोखात सावधपणे निघालेला. बाबरी मशीद एका टेकाडावर होती. मागच्या बाजूला मोठा खोलवर भाग.

    अयोध्येतील वादग्रस्त जागेचा ताबा घेण्याचा आदेश जारी झालेला असतो. चोहोबाजूने जवान सावकाशपणे अंदाज घेत पुढे निघालेले असतात. हळूहळू टेकाड चढून एक एक जण वर येतो. ज्या जागेवर मूर्ती ठेवल्या आहेत, तिला वेढा पडतो. इतक्यात कारसेवकांना खबर लागते. शंभर दोनशे तरुण सामोरे जातात. आरडाओरडा आणि गलका. सगळे खडबडून जागे होतात.

    जवान काठ्या लाठ्या आपटत चालून जातात. त्यामुळे एकच घबराट. जे कारसेवक सामना करायला जातात त्यांच्यावर सौम्यपणे छडीमार. जो तो धावत सुटतो. एव्हाना सगळे जागे होऊन परिसराकडे निगालेले असतात. 'राम कथा कुंज'चा माइक सुरू होतो. 'अयोध्यावासी चले आव, सीआरपीने हमला बोल किया हे', ` रामद्रोही आये हे. अयोध्यावासी चले आव.'

    हनुमानगढी आणि मानसभवनमधून दगडफेक सुरू होते. रॅपिड अॅक्शन फोर्सची त्वरेने कारवाई. अश्रुधूराची पाच नळकांडी फुटतात. दुसऱ्या बाजूने थंडगार पाण्याचा मारा. जो तो मिळेल त्या वाटेने. जीवन मुठीत घेऊन. कोण म्हणते फैरिंग हो रही है. मग आणखीनच धावाधाव. अवघ्या पंधरा मिनिटात सगळा परिसर रिकामा.

    रॅपिड अॅक्शन फोर्सची कारवाई फत्ते झालेली असते. सगळा विवाद्य परिसर ते ताब्यात घेतता. कारसेवक फैजाबादच्या रस्त्यावर जमलेले असतात. तिथेही चोहोबाजूने केंद्रीय राखीव पोलिस. कारसेवा रोखी गयी है. आप अपने अपने सीआरपीच्या गराड्यात राममूर्ती सुरक्षित. पूजेसाठी फक्त पुजाऱ्याच्या अपवाद.

    अयोध्या रेल्वे स्थानकावर परतण्यासाठी विशेष रेल्वे गाड्या लागल्या असतात. काल रात्रीपासून १८ गाड्या भरभरून कारसेवक गेले. थांबण्याचा आदेश असतानाही. रात्रीच पंतप्रधान नरसिंह राव यांचा निरोप आला होता, असे विहिंपवाले सांगतात. शांतपणे परिसर मोकळा करा, केन्दीय राखीव पोलिस मारहाण करणार नाही. झालं तसंच. किरकोळ दगडफेक आणि परचुटन लाठीमार. मामला संपला.

    सकाळपर्यंत राखीव पोलिसांनी संबंध अयोध्येत झडत्या घेतल्या. जे बाहेरगावचे होते, त्या सर्वांना बाहेर काढून वाटेला लावले. नऊ वाजेपर्यंत सगळ्या अयोध्येवर नियंत्रण. दुपारी १२ वाजेपर्यंत सबंध वादग्रस्त विभागाभोवती तारेचं जबर कुंपण उभारलं होतं. कुंपणाबरोबरच जागोजाग सशस्त्र जवान.

    उत्तर प्रदेशचे पोलिस कारसेवकांबरोबच दूर लोटलेले असतात. अयोध्येतील कारसेवकांच्या सर्व राहुट्या रिकाम्या झालेल्या असतात. दुपारी बाराच्या सुमारास महाराष्ट्रातील आणि खासकरून मुंबईचा जथ्था निघालेला असतो. हा जथ्थ्या शेवटचा असल्यामुळे अयोध्येत आता एकही कारसेवक उरलेला नसतो. सरचिटणीस अशोक सिंघल सकाळी पाऊणे दहाच्या सुमारास अयोध्या सोडून गेलेले असतात.

    गेले पंधरा दिवस गजबजलेली अयोध्या जवळजवळ निर्जीव. आठ दिवसरात्र चाललेले भटारखाने थंड झालेले. भटारखान्याबाहेर कांदे, बटाटे आणि वांग्यांचे ढीग तसेच पडलेले. गेले पंधरा दिवस अहोरात्र घसा कोरडा करणारा विहिंपचा ध्वनिक्षेपकही आता शांत झालेला असतो. त्यामुळे एकदम शांतता. अयोध्येत आता फक्त सीआरपीएफ आणि रॅपिड अॅक्शन फोर्सच्या मोटारींचा आवाज. जागोजागी कारसेवकांनी केलल्या जाळपोळीच्या खुणा आणि उद्ध्वस्त झालेली मुसलमानांची घरे. बाकी सर्व संपलंय

    (लेखक ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक आहेत. )






    ६ डिसेंबर १९९२ : साडेचारशे वर्षांची वास्तू साडेचार तासात जमीनदोस्त

    ०५ ऑगस्ट २०२०

    वाचन वेळ : १३ मिनिटं


    ६ डिसेंबर १९९२ या दिवसानंतर देशाचं राजकारण, धर्मकारण आणि समाजकारणही बदललं. त्या दिवशीची अयोध्या चित्रलेखाचे संपादक ज्ञानेश महाराव यांनी अनुभवलीय. त्यांचा रिपोर्ट असलेला २१ डिसेंबरचा चित्रलेखाचा अंक ब्लॅकने विकला गेला. त्यातला हा ऐतिहासिक रिपोर्ट.

    देशभरातील कोटी-कोटी लोकांचे कान अयोध्येहून येणार्‍या बातमीसाठी अधीर झाले होते. तर अयोध्येत जमलेल्या लक्ष लक्ष कारसेवकांचे डोळे ‘त्या’ वादग्रस्त वास्तूकडे लागले होते. 

    आदल्याच दिवशी मी फैजाबादेतला मुक्काम हलवला आणि बाबरी मशिदीच्या अगदी समोर म्हणजे दोनशे फुटांवरच्या राम चरित मानस भवनात ५ - ६ डिसेंबरची रात्र काढण्यासाठी आलो. या मानस भवनच्या गच्चीवर देशभरातून आलेल्या पत्रकार, छायाचित्रकारांना ‘आँखो देखा हाल’ टिपण्यासाठी विहिंपने जागा करून दिली होती. पण पुढे त्याचे अक्षरशः बारा वाजले!

    यापूर्वी आठवडाभर फैजाबाद-अयोध्या अशी  जा ये  करीत होतो. त्यावेळी पाहिलेली उत्साहाने ओसंडून वाहणारी अयोध्या आणि आज दिसणारी अयोध्या यात जमीन अस्मानाचा फरक होता. यापूर्वी होणार्‍या ‘जय श्रीराम’च्या घोषणात श्रद्धेचा आणि ‘मंदिर वही बनाऐंगे’चा ठामपणा ओसंडून वाहत होता. आज त्या जयजयकारात आक्रमकतेचा फूत्कार स्पष्टपणे दिसत होता.

    पाच डिसेंबरची रात्र महत्त्वाची होती. कुठे काय शिजतंय, त्याचा कानोसा घेण्यासाठी रात्री दहा वाजता अयोध्येचा फेरफटका सुरू केला. त्यात मध्य प्रदेशातले एक भाजप खासदार भेटले. त्यांनी ‘चंबळ खोर्‍यातून ५०० जणांचा एक बलिदान जत्था आला असून तो उद्या साडेतीन चार दरम्यान वादग्रस्त वास्तूवर चाल करून ती उद्ध्वस्त करतील,’ अशी अंदर की बात सांगितली. 

    अफवांचा सुळसुळाट वाढत असला, तरी खासदारांच्या ‘बात’कडे दुर्लक्ष करावंसं वाटलं नाही. कारण अयोध्येचा रंग त्या रात्री झपाट्याने बदलत होता. त्या रात्री तास-दोन तास झोपलो असू, तेवढेच! कारण त्या खासदाराने दिलेली ‘टीप’ आणि लाऊडस्पीकरवरून भसाड्या आवाजात रात्रभर रेकत असलेली रामधून आमचा डोळाच लागू देईना.

    त्याच रात्री वादग्रस्त वास्तूपुढच्या ‘नियोजित राम मंदिर’ परिसरात बांधकामाचं सामान येऊन पडलं. नगरपालिकेच्या गाड्या कचरा, घाण उचलून नेत होत्या, तर संघाचे काही स्वयंसेवक वादग्रस्त वास्तू परिसरातील सुरक्षाव्यवस्था मजबूत करण्याच्याच कामाला लागले होते. पण या घडामोडी दुसर्‍या दिवशी काय घडणार, याचा अंदाज घेण्यास पुरेशा नव्हत्या. 

    सहा डिसेंबर उजाडला. शरयू काठी स्नान करणार्‍यांची आज नेहमीपेक्षा अधिक गर्दी जमली होती. त्यातले बरेचजण ओंजळीत शरयूचं पाणी घेऊन आणि सूर्याला साक्षी ठेवून मंदिर वही बनाएंगेची शपथ घेत होते. तशीच अयोध्येत आलेल्या प्रत्येक कारसेवकाची तीव्र इच्छा होती. परंतु वरिष्ठ नेत्यांनी आणि साधूमहंतांनी त्यांना अनुशासनात वचनबद्ध केलं होतं. ते त्यांनी पाळायचं ठरवलं होतं. ‘लोटाभर पाणी आणि मूठभर माती’ नियोजित राम मंदिराच्या जागी टाकायचं आणि आपल्या मुक्कामी परतायचं, ही कारसेवा कारसेवकांनी मान्य केली असली तरी, मंदिर वही बनाऐंगेची अंतरीची ऊर्मी त्यांना अवस्थ करीत होती.

    बाबरी मशिदीत मूर्ती स्वरूपात असलेल्या ‘रामलल्ला’च्या म्हणजे बालरामाच्या दर्शनाची वेळ सकाळी ८ ते रात्री ८ अशी होती. गेला आठवडाभर त्याच्या दर्शनासाठी पहाटे पाचपासूनच रांग लागायची. सहा डिसेंबरला मात्र तशी गर्दी नव्हती. तुरळक लोकच दर्शनाला येत होते.त्यांनाही दर्शन झालं की, पोलिस त्वरित बाहेर पिटाळायचे.

    सकाळचे आठ वाजले तशी बाबरीपासून तीनशे मीटरवर असलेल्या ‘रामकथा कुंज’ परिसरात कारसेवकांची गर्दी जमू लागली. कारसेवकांच्या व्यवस्थेचं मुख्य कार्यालय असलेल्या ‘राम कथा कुंज’ची गच्ची तीनचार दिवसांपासून सभेचं व्यासपीठ झाली होती. सहा डिसेंबरलाही आठ तासांच्या सभेचा कार्यक्रम होता. वक्त्यांचा क्रमही ठरला होता. अकराच्या दरम्यान तिथे लाखोंचा जमाव जमला. भाषणबाजी सुरू झाली, ती नेहमीसारखीच होती. पण जमलेले कारसेवक ही भाषणबाजी नेहमीसारखे कान देऊन ऐकत नव्हते. सार्‍यांचे डोळे त्या बाबरी मशिदीकडे लागले होते.

    या दरम्यानच बाबरीच्या भोवतीचं वातावरण हळूहळू तापू लागलं. वादग्रस्त बाबरी मशिदीसमोरचा परिसर म्हणजे नियोजित राममंदिराचा अर्धा भाग. यात सिंहद्वार, सभामंडप, नृत्यमंडप असा भाग येतो, तर उर्वरित भाग बाबरी मशिदीत जिथे ‘रामलल्ला’च्या मूर्ती होत्या, तो होता. ते नियोजित मंदिराचं गर्भगृह!

    सिंहद्वार, सभामंडप आणि नृत्यमंडपाच्या पायाभरणीचं काम गेल्या कारसेवेत जवळजवळ पूर्ण झालं होतं. सभामंडपाचा भाग उंच असल्याने त्याचा चौथरा झाला होता. तिथे दुपारी १२.१५ पासून सुरू होणार्‍या कारसेवेला शास्त्रोक्त मार्गदर्शन करण्यासाठी साधूमहंत जमत होते. या परिसरात फक्त पत्रकार आणि साधूमहंतांनाच प्रवेश करण्यासाठी परवानगी देण्यात आली होती. 

    या परिसरात येण्यासाठी फक्त दोन मार्ग होते. एक, ‘राम कथा कुंज’कडून, तर दुसरा, हनुमान गढीतून येणारा ‘मानस भवना’च्या वळणावरचा! हे दोन्ही प्रवेश मार्ग जेमतेम दहा फुटांचे. ते ओलांडले, की मात्र पुढे मोकळा परिसर. काही पत्रकारांप्रमाणेच मी आणि चित्रलेखाचा फोटोग्राफर उभे होतो. 

    या राखीव भागात ‘राम कथा कुंज’कडून येणारे कारसेवक त्या परिसरात दाटलेल्या गर्दीमुळे आत घुसण्याचा प्रयत्न करत होते. तसाच प्रयत्न हनुमान गढी मार्गाने येणारे कारसेवक दांडगाई करीत करत होते. या परिसराची सुरक्षाव्यवस्था जवानांकडे असली, तरी ‘गणवेषधारी’ संघाचे स्वयंसेवक कारसेवकांच्या रेट्याला थोपवत होते. हनुमान गढीच्या चिंचोळ्या रस्त्याने अशोक सिंघल, लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी आदिंच्या गाड्या आल्याने त्या प्रवेशद्वारावर आत घुसू पाहणार्‍या कारसेवकांचा रेट्याचा ताण अधिक होऊ लागला. 

    या रेटारेटीत काही कारसेवक आत घुसण्यात यशस्वी होत होते. दोन-चार साधू त्यांना सारा काम तुम लोग बिघडाएंगे असं म्हणत हातातल्या दंडुक्याने चोप देत होते. काही कारसेवक मार टाळण्यासाठी साधूंना हात जोडून क्षमायाचना करीत होते. साधू त्यांना माफ करीत होते. 

    सकाळी ११नंतर बाबरी पुढच्या राखीव भागात एकेक नेते येऊ लागले. तशी प्रवेशद्वाराच्या संरक्षणाची मानवी साखळी तुटायची. त्याचा फायदा घेऊन ५०-६० कारसेवकांची झुंड आत घुसायची. लालकृष्ण अडवाणी आणि अशोक सिंघलांना इथेच धक्काबुक्की झाली. ही धक्काबुक्की गर्दीमुळे नव्हे, तर ती कारसेवा मंदिरासाठी आणलेल्या विटा रचण्याऐवजी ‘लोटाभर पाणी आणि मूठभर माती’ टाकण्यासाठी आणल्यामुळे कारसेवकात निर्माण झालेल्या रागाने झाली होती. साधू-महंतांना मात्र कमालीचा आदर लाभत होता. 

    महंत परमहंस आणि अवैद्यनाथ हे साधूंचे बडे म्होरके त्या परिसरात आले आणि त्या चौथर्‍यावर विसावले. बाकी नेते भाषण देण्यासाठी ‘रामकथा कुंज’च्या दिशेने निघाले. शिवसेनेचे उपस्थित असलेले एकमेव खासदार मोरेश्वर सावे हे सुरक्षित राहण्यासाठी अशोक सिंघलांची सावली बनून त्या परिसरात फिरत होते. साडेअकरा वाजले. एव्हाना ‘मानस भवन’च्या गच्चीवरून पत्रकारांना पिटाळण्यात कारसेवक यशस्वी झाले होते. विहिंप मीडिया सेंटरचे प्रमुख रामशंकर अग्निहोत्री आम्हाला सांगत होते, ‘पत्रकारांना इथे चांगली वागणूक मिळाली नाही, असं खुशाल छापा. हा अन्याय तुम्ही अजिबात सहन करू नका.’ 

    अग्निहोत्री पत्रकारांवरील अन्यायाबद्दल बोलत होते, पण पुढे कारसेवकांनी पत्रकारांवर अक्षरशः अत्याचार केला. मानस भवनच्या गच्चीचा ताबा घेतलेले कारसेवक आता बाबरीपुढील परिसरात घुसू पाहणार्‍या आणि घुसलेल्या कारसेवकांचा, घोषणा देत जोष वाढवण्याचं काम करू लागले. त्या प्रोत्साहनाने जोरदार मुसंडी मारून दोन अडीच हजार कारसेवक बाबरी मशिदीभोवतालच्या परिसरात घुसले. 

    केंद्रीय जवान आणि संघ स्वयंसेवक त्यांना बाहेर हुसकावण्याचा प्रयत्न करू लागले. पण तो प्रयत्न अयशस्वी झाल्याने ते हताश झाले होते. हा सारा प्रकार साडेदहापासून त्या परिसरात हजर असलेले उच्च न्यायालयाने निरीक्षक म्हणून नेमणूक केलेले तेजशंकर पंचवीस फुटांवर असलेल्या ‘सीता रसोई’च्या गच्चीवरून शांतपणे पाहात होते. त्यांच्या आजूबाजूला उत्तर प्रदेशचे पोलीस दलाचे प्रमुखही होते.

    दरम्यान अकरा वाजल्यापासून फैझाबादमधून निवडून आलेले शिवसेनाचे उत्तर प्रदेशातील एकमेव आमदार पवनकुमार पांडे यांच्या नेतृत्वाखाली हजारभर शिवसैनिक शिस्तीने हनुमान गढीकडून जो रस्ता वादग्रस्त वास्तूच्या मागील बाजूस जातो, त्या रस्त्यावर फेर्‍या मारीत होते. त्यातील बर्‍याच जणांच्या हाती तलवारी, भाले होते. मध्येच छरे उडवणार्‍या बंदुकीचाही आवाज येत होता. या शिवसैनिकांनी प्रयत्न केला असता, तर त्यांना वादग्रस्त वास्तूपुढील परिसरात सहज प्रवेश मिळाला असता. परंतु ते कमालीच्या शिस्तीने त्या रस्त्याने मिरवणुकीचा आव आणून फेर्‍या मारत होते.

    सव्वाअकराच्या दरम्यान साध्वी ॠतंभरांची बाबरी पुढच्या मंदिर चौथर्‍यावर भेट झाली. सोबत त्यांचे गुरूही सोबत होते. आज त्या भलत्याच खुषीत  होत्या. भाषा सौम्य होती, पण त्यात ठामपणा ठासून भरला होता. चित्रलेखाशी बोलताना त्या पुढच्या घटनेची जवळजवळ सूचनाच देत होत्या. त्या बोलत होत्या, ‘इथे जे लाखो कारसेवक जमले आहेत, ते मूठभर माती आणि लोटाभर पाणी टाकण्यासाठी नाहीत. जे काही करायचं ते आजच, असा त्यांचा ठाम निश्चय आहे.’

    आपण भडकावू भाषणं करून लोकांना का चिथावता, या प्रश्नावर ॠतंभरा म्हणाल्या, ‘मी लोकांच्या भावना व्यक्त करते. मला त्या कळतात. तुम्हाला त्या कळत नाहीत म्हणून माझं बोलणं भडकावू वाटतं. थोडा वेळ इथंच थांबा, म्हणजे लोकभावना कशा असतात, त्या तुम्हालाही कळतील.’

    ॠतंभरा सूचकपणे सारं बोलत होत्या म्हणून त्यांना विचारलं, ‘भगवी वस्त्र परिधान करून तुम्ही राजकारण्यांसारखी भाषा वापरता. तुम्ही थेट राजकारणातच का नाही जात?’ त्यावर त्या हसत हसत म्हणाल्या, ‘राजकारणात जाऊन काय करणार? भगवी वस्त्रं परिधान करून राजकारण्यांकडून बरंच काही करवून घेता येतं.’

    ॠतंभरांशी बोलत असताना एक विचित्र प्रकार त्या परिसरात घडला. आत घुसलेल्या कारसेवकांना हुसकवण्याचं काम ५०-६० दणकट कारसेवक करीत होते. त्यांच्या डोक्याला पिवळ्या पट्ट्या गुंडाळलेल्या होत्या. खरं तर तोपर्यंत आत घुसलेले कारसेवक शांतपणे ‘जय श्रीराम’चा जयजयकार करीत होते. काही फेर धरून नाचत होते. काही तिथे जमलेल्या साधूमहंतांना श्रद्धाभावाने निरखत होते. 

    साधू मात्र छायाचित्रकारांना पाहिजे त्या पोझेस  देत होते. त्यातही चढाओढ सुरू होती. फोटोसाठी बहुतेक साधू हपापलेले होते. या गोंधळाने वैतागलेले अयोध्यावासी गोपाळदास चित्रलेखाशी बोलताना म्हणाले, ‘एक तर, या साधूंना कळत नाही, तुमचे छायाचित्रकार कशाला त्यांच्यापुढे कॅमेरे नाचवतात? नेहमी अर्धा गोंधळ तुमचे कॅमेरेच उडवतात.’

    एव्हाना पिवळे पट्टेवाल्या कारसेवकांच्या अनपेक्षित हल्ल्यामुळे भगवे पट्टेवाले कारसेवक बिथरले. पिवळे पट्टेवाले त्यांना अक्षरशः बुकलून काढत होते. उचलून फेकत होते. पण ‘मानस भवन’वरून मिळणार्‍या प्रोत्साहनाने आणि बाहेरील कारसेवकांच्या मिळालेल्या जोषामुळे आतले कारसेवकही सरसावले. कारसेवकांतच हाणामारी सुरू झाली. एका कारसेवकाने तर तिथे सुरक्षेसाठी दक्ष असलेल्या संघ स्वयंसेवकांच्या ६०-६५ वयाच्या प्रमुखाच्या शर्टची कॉलरच पकडली. 

    पिवळे पट्टेवाले कारसेवक माघारी फिरले, पण तोच मोका हनुमान गढीच्या बाजूने घुसू पाहणार्‍या कारसेवकांनी साधला. हजारो कारसेवक आत घुसले. संघाचे स्वयंसेवक दूर पळाले. जवान थंडपणे जे घडतंय ते पाहात होते. एकच गोंधळ उडाला. मंदिर चौथर्‍यावरचे साधू महंतही आपली भगवी वस्त्रं सावरत पळू लागले. कारसेवकांचा धावता लोंढा अजून त्या परिसरात येत होता. आता करायचं काय? कुणी तरी वादग्रस्त बाबरी मशिदीच्या दिशेने दगड भिरकावला. पाठोपाठ दगडफेक सुरू झाली.

    कुंपणाआडच्या जवानांनी कुंपण ओलांडू पाहणार्‍यांना रोखण्याचा दुबळा प्रयत्न केला. पण तुफान दगडफेकीने त्यांनी पळ काढताच, एकाचवेळी शेकडो कारसेवक तारेचं कुंपण ओलांडण्याचा प्रयत्न करू लागले. पवनकुमार पांडेंचे शिवसैनिक बाबरी मशिदीबाहेर गस्त घालतच होते. त्यांना तर मोकळीच वाट मिळाली. कारण दगडफेकीतून बचाव करण्यासाठी जवानांनी बाबरीतून पळ काढून दरवाजा मोकळा केल्याने, ते मोकाटपणे आत शिरले. या अनपेक्षित घुसखोरीने आतील केंद्रीय राखीव पोलीस दलाचे पोलीसही पळाले. त्यांना गोळीबाराचा आदेश नव्हता, तर बाहेरच्या केंद्रीय जवानांना लाठीमाराचा आदेश नव्हता. हे सारं जेव्हा घडलं, तेव्हा बरोबर ११ वाजून ५० मिनिटं झाली होती. जय श्रीरामच्या जयजयकाराबरोबर आता आकाश फाडणार्‍या घोषणा होऊ लागल्या.

    `राम के काम में टांग जो अडाएगा,
    कसम सीधा वो उपर चला जाएगा...`

    `तेल लगावो डाबरका... नाम मिटावो बाबरका`

    आता बाबरी मशिदीला चारही बाजूने हजारो कारसेवकांचा जमाव अनावरपणे धडका देऊ लागला. त्याने बाबरीभोवतीचं १० फूट उंचीचं आणि ४ फूट रुंदीचं दणकट लोखंडी तारेचं काटेरी कुंपण बघता बघता वाकवलं. ठीक ११.५५ला २५-३० कारसेवक वादग्रस्त वास्तूच्या तीनही घुमटावर चढून श्रीरामाचा जयजयकार करत नोव्हेंबर १९९०च्या कारसेवेत धारातीर्थी पडलेल्या ‘कोठारी बंधू अमर रहे’चा नारा देऊ लागले. याच वेळी ‘राम कथा कुंज’समोरील भाषणबाजी थांबली. त्या भोवतीच्या सार्‍या जमावाचे लाखो डोळे बाबरी मशिदीकडे लागले. एव्हाना मशिदीच्या घुमटावर भगवे झेंडे डौलाने फडकू लागले.

    बरोबर बारा वाजले आणि वादग्रस्त बाबरीवर पहिला प्रहार पडताच हजारो कारसेवकांचे हात हाती मिळेल त्या वस्तूने त्या वास्तूला दणादण हादरे देऊ लागले. या हल्ल्याने सव्वाबाराला सुरू होणार्‍या विहिंपच्या कारसेवेचे पुरते बारा वाजले. ते त्यांच्या नेत्यांच्या लक्षात येताच ‘कारसेवा स्थगित करण्यात आलीय,’ अशी घोषणा लाउडस्पीकरवरून देण्यात आली आणि भसाड्या आवाजातली रामधून  सुरू झाली. आपण कारसेवा करण्यासाठी आलो आहोत. वरिष्ठ नेत्यांनी आणि संत-महंतांनी घोषित केलेल्या कारसेवेशी तुम्ही वचनबद्ध आहात, आपण इथं मंदिर बांधण्यासाठी आलो आहोत, याची आठवण ठेवा, अशा सूचना आवाहन मधेच ‘रामधून’ थांबवून लाउडस्पीकरवरून होऊ लागल्या. परंतु अनावर झालेले कारसेवक ते ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते. त्यांचं लक्ष्य एकच होतं, मंदिर वही बनाऐंगे.

    आता बाबरीपुढचा सारा ‘राखीव भाग’ कारसेवकांनी भरला होता. त्यांच्यात बाबरीत घुसण्यासाठी जोरदार धक्काबुक्की सुरू झाली. ती टिपण्यासाठी पत्रकार आणि फोटोग्राफर धावपळ करत होते. तेवढ्यात, ‘मानस भवन’वरून चेंदामेंदा झालेला कॅमेरे भिरभिरत खाली आले. बस, तितकंच पुरेसं होतं. त्या परिसरात आणि बाबरीच्या चहूबाजूला क्लिक-क्लिकणारे कॅमेरे आणि कॅमेरामन जीवघेण्या संकटात सापडले. ज्यांनी पळ काढला ते वाचले. 

    ज्यांना धोक्याची कल्पना आली नाही, त्यांना मात्र जीवघेणा चोप मिळाला. काहींच्या गळ्यावरून चाकूचे वार झाले. पैसे हिसकावून घेतले गेले. गळ्यातल्या सोन्याच्या चेन-आंगठ्या खेचल्या गेल्या आणि त्यांच्या कॅमेर्‍याच्या तर पार चिंधड्या-चिंधड्या झाल्या. शंभराहून अधिक कॅमेरामनना या जीवघेण्या अनुभवातून जावं लागलं. ‘पेपरवाले खोटं लिहितात. वास्तूचा बाबराची मशीद असा उल्लेख करतात. आता तरी खरंखरं लिहितील.’ असं पत्रकार-छायाचित्रकारांना झोडणार्‍यांचं म्हणणं होतं. बीबीसीने ‘अयोध्येत लाठीमार झाल्याची’ चुकीची बातमी दिल्याने, पत्रकार-छायाचित्रकारांच्या या मारझोडीला खुनशी वळण आलं. 

    बाबरी मशिदीवर चाल करून जाणार्‍या कारसेवकांचा तोडफोडीचा इरादा तेव्हा तरी नव्हता. गोळ्या खाण्याची तयारी करून ते बाबरीच्या माथ्यावर ठिय्या देऊन बसले होते. त्यांच्या हाती तोडफोडीची कोणतीही हत्यारं नव्हती. पोलिसही स्तब्ध होते. त्यांच्याकडून काहीतरी प्रतिकार होईल, अशी अपेक्षा होती.साधूमहंत अवाकपणे सारं पाहत होते. काही कारसेवकांनी लोखंडी कुंपणाचे फुटाफुटावर लावलेले पोल हाती घेतले. काही ते घेऊन वादग्रस्त वास्तूचं खालचं टेकाड खणू लागले, पण ते निरर्थक होतं.वादग्रस्त वास्तूच्या डोक्यावर बसलेले कारसेवक बसल्या जागी ठोकाठोक करीत होते. पण त्यामुळे शेकडो पावसाळे पचवलेल्या त्या वास्तूचे फक्त कोपरे-कपचे उडत होते.

    आता कारसेवकांच्या झुंडीच्या झुंडी बाबरीत आत शिरण्याचा प्रयत्न करीत होत्या. पण त्यांच्यात आणि आत शिरून पराक्रमाच्या निशाण्या असलेल्या दगड-विटा घेऊन परतणार्‍यांत चेंगराचेंगरी होत होती. अजून तरी ती वादग्रस्त वास्तू जमीनदोस्त करण्याचा इरादा स्पष्टपणे दिसत नव्हता, पण घुमटावर चढून उतरताना जखमी झालेल्यांची आणि चेंगराचेंगरीत तुडवलेल्यांची संख्या सेकंदासेकंदाला वाढत होती.

    आणि अयोध्येत? अवघा आनंदी आनंद पसरला होता. विहिंपवाले इतके दिवस शब्दांची रस्सीखेच करून, ते मंदिर आहे आणि आम्ही त्याचा जीर्णोद्धार करणार आहोत, असं सांगत होते. पण अयोध्येत जमलेले कारसेवक ‘आपण मशीद पाडली’ असं नाचत उड्या मारत सांगत होते. पण हे आपलंच मंदिर हल्लागुल्ला करून पाडणं, कुठल्या शास्त्रात बसणारं होतं? या प्रश्नांची त्यांना फिकीर नव्हती.

    सार्‍या अयोध्याभर मशीद पाडण्याचं काम सुरू झाल्याची वार्ता पसरली. अवघी अयोध्या गुलालाच्या उधळणीत न्हाऊन निघाली. कोसळणार्‍या वास्तूतील दगड-विटा घेऊन माणसं रस्त्यावर नाचत  होती. कुणी त्या वास्तूची माती अंगाला चोपडली होती, तर कुणी लोखंडाचे पोल खांद्यावर घेऊन चालला होता. एकाला ‘हे कुठे घेऊन चाललास?’ असं विचारताच तो म्हणाला, ‘आम्ही अयोध्येतली दुसरी एक मशीद पाडण्यासाठी हे घेऊन जातोय !’

    गुलालात न्हाऊन निघालेल्या अयोध्येत आता नाक्या-नाक्यावर साखर-मिठाई वाटपाबरोबर चर्चा ऐकायला मिळत होती, ‘आज का दिन अपना है, जो भी कर ले!’ आणि घडतही तसंच होतं.

    इकडे वादग्रस्त वास्तूशी अजूनही कारसेवकांची झोंबाझोंबी सुरू होती. आतली ‘रामलल्ला’ची मूर्ती एव्हाना हलली होती. सोबत आत असलेली बाबरच्या कुकर्माची साक्ष देणारी शिलाही कुणीतरी लांबवली. आतील फोटो, अन्य मूर्तीही बाहेर आल्या. त्या विश्व हिंदू परिषदच्या अयोध्या कार्यालयात गेल्या. पण बाबराच्या नावाची शिला गेली ती गेलीच!

    दुपारचा एक वाजला. वादग्रस्त वास्तू अजून कारसेवकांच्या हादर्‍यांना दाद देत नव्हती. जखमींची संख्या मात्र क्षणोक्षणी वाढत होती. कारसेवक कमालीचे अनावर झाले होते, तेवढ्यात डावा डोळा बाहेर लोंबकळणारा कारसेवक पाहून थरकाप उडाला. मानस भवनाच्या तळमजल्यावर हे जखमी कारसेवक उपचारासाठी आणले जात होते. तिथे त्यांची देखभाल करणारे अयोध्यावासी गोपाळदास भेटले. दीड तासापूर्वी ते भेटले होते. गेली चाळीस वर्षं ते अयोध्येत राहातात. ते मूळचे विदर्भातले मराठी. 

    त्यांना प्रतिक्रिया विचारताच म्हणाले, ‘आम्ही खूष झालो आहोत. असे प्रश्‍न असेच मिटतात.’ तेवढ्यात कुणीतरी अंगभर माती माखलेल्या १४-१५ वर्षांच्या मुलीला तिथे घेऊन आला आणि त्यांना सांगू लागला. ‘ही अगदी वरपर्यंत चढली.’ गोपाळदासजींनी तिची पाट थोपटली. तेवढ्यात परभणीचा एक कारसेवक पुन्हा बाबरीवर चढण्यासाठी परवानगी मागू लागला. गोपालदासनी त्याला बजावलं, ‘एकदा जाऊन आलास ना, आता पुन्हा नाही.’ तो गयावया करू लागला, तेव्हा त्यांनी त्याला दटावलं आणि ते जखमींवर उपचार करण्याच्या कामाला लागले.

    त्या वादग्रस्त बाबरी मशिदीवर चढणं तसं सोपं काम नव्हतं. ८० फूट लांब, ४० फूट रुंद आणि सुमारे ६० फूट उंचीची ती वास्तू. त्यावरचे तुळतुळीत पृष्ठभाग असलेले तीन घुमट अधिक धोकादायक होते. थोडा जरी तोल गेला, तर ६० फूट खाली आदळण्याशिवाय गत्यंतरच नाही. खाली पडलं की, तिथे असलेली कारसेवकांची गर्दी पडलेल्याला तुडवायची. यातच कारसेवक मोठ्या संख्येने जखमी झाले.

    सव्वा दीडच्या दरम्यान रामधून  थांबली आणि लाऊडस्पीकरवरून घोषणा झाली. अब रामद्रोही आनेवाले है! गोली खाने के लिए तैयार रहो. जिथे आहात तिथेच बसा. रामद्रोहींना आत प्रवेश करू देऊ नका. अयोध्या प्रवेशाचे सारे मार्ग कारसेवकांनी अडवून ठेवावे.’

    लाऊडस्पीकरवरची सूचना बरोबर होती. कारण रॅपिड ऍक्शन फोर्स अयोध्येच्या दिशेने कूच करीत होती. पण रस्त्यावर उभे केलेले अडथळे त्यांना पुढे जाऊ देत नव्हते. त्यांच्यावर तुफान दगडफेक होत होती. मागे हटण्याशिवाय त्यांना गत्यंतर नव्हतं. प्रचंड ताकदीने त्यांना विरोध होत होता. झटपट कारवाईची त्यांची बात आता कुचकामी ठरली होती. कारण चार दिवसांपूर्वीच्या ‘बाबरीला धोका झाल्यास आम्ही अवघ्या तीन मिनिटात ठीकठाक करू,’ या फोर्सच्या प्रमुखाच्या जबानीचे तीन तेरा झाले होते. 

    रामकथा कुंजच्या गच्चीवरून आता बाबरीशी झोंबणार्‍या कारसेवकांना नेमक्या सूचना मिळू लागल्या. कारण एव्हाना जमलेल्या नेतेमंडळीत चर्चा होऊन नेमका निर्णय झाला असावा. तसा निर्णय झाला नसता, तर राम कथा कुंजच्या गच्चीवरच्या नेत्यांची आणि साधू महंतांचीही हालत बाबरीसारखीच झाली असती. कारसेवकांनीच त्यांना निर्णय घ्यायला लावला. साधू महंत हे कारसेवकांच्याच बाजूचे होते. गेली ४३ वर्षं या वादग्रस्त वास्तूसाठी लढा देणारे ‘रामजन्मभूमी न्यास’चे अध्यक्ष परमहंस महाराज चित्रलेखाशी बोलताना म्हणाले होते, ‘बाबराने ताकदीने ते मंदिर तोडून मशीद बांधली! आम्हीही मशीद तोडूनच मंदिर बांधू!’ त्यांचेच शब्द खरे ठरले. 

    पोलिसांकडून कुठलाच प्रतिकार होत नाही आणि वेळ तर वाया जातोय, तेव्हा कारसेवकांनी घेतलेल्या निर्णयाशी सहमत होण्याशिवाय गत्यंतर नाही, हे रामकथा कुंजच्या गच्चीवरल्या नेत्यांच्या लक्षात आलं. दोन तासांपूर्वी अनुशासनाच्या घोषणा देणारे नेते आता सूचना देऊ लागले. ‘घुमटावर चढलेल्या कारसेवकांनी त्वरित खाली उतरा. आणि बाजूच्या भिंती फोडायला सुरुवात करा.’ या घोषणा ते हिंदी बरोबर विविध भारतीय भाषांत देत होते. 

    सूचना नेमकी मिळाली, पण तापलेले कारसेवक ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते. तेव्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह हो. वे. शेषाद्री माईकवरून बोलू लागले. ‘जे संघ स्वयंसेवक असतील त्यांनी त्वरित खाली उतरा,’ आणि त्या सूचनेला त्वरित प्रतिसाद मिळाला. कारसेवक पटापट खाली उतरू लागले. यावेळच्या कारसेवकात संघाच्या तालमीत तयार झालेल्या कारसेवकांचा भरणा अधिक असल्याने शेषाद्रींच्या सूचनेला त्वरित प्रतिसाद मिळाला.

    आता सूचनेची अंमलबजावणी होऊ लागली. दरम्यान गावातून कुदळ, फावडी, पहार आदि तोडफोडीचं सामान आलं होतं. सोबत, कुंपणाचे दणकट लोखंडी पोल होतेच. भिंतीवर दणादण घाव बसू लागले. पंधरा वीसजण लोखंडी पोल खांद्यावर घेऊन बाबरीला जय श्रीराम करत दणके देऊ लागले. मातीविटांची ती भिंत या प्रचंड दणक्यांना किती सामना देणार? भिंतीला भगदाडं पडत होती. तीन घुमटांची ती वास्तू. दुपारी सव्वादोनच्या सुमारास दक्षिणेकडील घुमटाखालच्या भिंती कोलमडल्या आणि गेली ४५० वर्षं मिरवणारा एक घुमट जमीनदोस्त झाला. ‘जय श्रीराम’च्या घोषणेने आसमंत दुमदुमला. ‘कोठारी बंधू अमर रहे’चा नारा झाला.

    उमा भारती आणि ऋतंभरा घणाघाती भाषण करत होत्या. धर्माचा अर्थ सांगत होत्या. कारसेवक तापत होते. बाबरीला धडका देत होते. और एक धक्का जोरसे दे दो असा आवाज ॠतंबरा देत होत्या आणि ‘जय श्रीराम’च्या घोषणेत कारसेवकांच्या खांद्यावरचे लोखंडी पोल बाबरीवर आदळत होते. ॠतंभरा अधूनमधून ‘कॉमेंट्री’ सांगावी तशी चाललेल्या तोडाफोडीची आणि रामजन्मभूमी लढ्याची माहिती देत होत्या. एव्हाना बाबरी भोवतीच्या भागात लाखो बघ्यांची गदी जमली होती. ‘राम कथा कुंज’ समोरचे लाखो कारसेवक रामनामाचा गजर करीत इतिहास बदलवणारी ऐतिहासिक घडामोड आपल्या डोळ्यांत साठवत होते.

    आणि ही वार्ता जगभर पोचवणारे पत्रकार छायाचित्रकार मात्र आपला जीव मुठीत घेऊन सुरक्षेसाठी पोलीस कंट्रोल रूममधे जमले होते. वार्ता पोहोचवणार तरी कशी? अयोध्येची ‘सी.टी.ओ’ यंत्रणा ठप्प झाली होती. कारसेवकांनी टेलिफोन लायनी तोडल्या होत्या आाणि सहा किमीवर असलेल्या फैजाबादला जाणं, एव्हाना धोक्याचं झालं होतं. मी अजूनही नियोजित राममंदिराच्या चौथर्‍याच्या ‘राखीव’ भागात होतो. सारी तोडफोड डोळ्यांनी पाहात होतो. परंतु कॅमेर्‍याने ते टिपण्याची हिंमत होत नव्हती. आगाऊपणा करून तेवढी हिंमत केली असती तर, जे फोटो मिळाले तेही गेले असते आणि लिहिण्यासाठी हातही इतका चालला नसता.

    तासाभराची तोडफोड पाहिल्यानंतर फोटोग्राफरसह ‘मानस भवन’मधील आमच्या रूमवर गेलो. कारण फोटो काढलेले रोल सुरक्षित ठेवायचे होते. दार ठोठावलं. उघडलं. तर आत दोन परदेशी तरुणी थरथरत असलेल्या दिसल्या. आम्हाला पाहून आणखीन घाबरल्या होत्या. त्यांच्याशी बोलल्यावर, आम्ही ज्या बिहारच्या पत्रकाराबरोबर तिथे राहात होतो, त्याने त्यांना आसरा दिल्याचं कळलं. 

    दोघीही इटालीच्या पत्रकार होत्या. असली धाडसं त्यांना नेहमीची होती. पण कारसेवक छायाचित्रकारांची आणि त्यातही विदेशी पत्रकार छायाचित्रकारांची पिटाई करीत असल्यामुळे त्या कमालीच्या बिथरल्या होत्या. आम्ही धोका पत्करून त्यांना ‘इथे निवांत राहा’ म्हणून सांगितलं. डोक्यावर म्हणजे मानस भवनच्या गच्चीवर पेटलेले आणि समोर तोडफोड करणारे कारसेवक असूनही ‘आमचं निवांत राहा’ म्हणून सांगणं त्यांना पोकळ वाटत नव्हतं. कारण भारतीय संस्कृतीची त्यांना चांगली माहिती होती. 

    आम्ही खाली उतरलो, तर आणखी एक अमेरिकन युवती पत्रकार घाबरलेल्या स्थितीत मानस भवनच्या कार्यालयात दिसली. आम्ही तिला ‘आमच्या रूमवर चल,’ म्हणून सांगितलं खरं, पण तिथपर्यंतची १०० पावलं चालणं अधिक धोकादायक वाटत होतं. ती सांगत होती, ‘मला लागलं तरी चालेल, पण सोबतच्या कॅमेर्‍याचं नुकसान होऊ देऊ नका.’ तो कॅमेरा आम्ही एकाच्या खांद्यावर दिला आणि चालू लागलो. दरम्यान, २०-२५ जणांच्या टोळक्याने आमचा पिच्छा केलाच. तिला रूममधे सोडून त्यांना आम्ही बजावलं आणि पुन्हा कोसळणार्‍या वास्तूपुढे आलो. 

    दुपारचे साडेतीन वाजले होते. उत्तरेकडच्या घुमटाच्या खालच्या भिंतींनी माना टाकल्या आणि तोही घुमट कोसळला. या घुमटाखालच्या भागात कौसल्याची रसोई होती. कोसळणारा घुमट १००-१२५ जणांना घायाळ करून जाई. परंतु वाचलेले कारसेवक त्यांना श्रीरामाचा जयघोष करीत तातडीने उपचारासाठी धावत नेत.

    अजून शेवटचा घुमट आणि त्याखालचा भाग शिल्लक होता. कोसळलेला ढिगारा बाकीचे कारसेवक जलदगतीने साफ करीत होते. तसं करणं कठीण नव्हतं. कारण त्या ढिगार्‍यातील दगड, माती, विटा केव्हाच पराक्रमाच्या निशाण्या झाल्या होत्या. त्या मिळवण्यासाठी कारसेवकात चढाओढ लागायची. त्या दगड विटा मिळणारे कारसेवक डोक्यावर हातात घेऊन बेहोष नाचत होते.

    उरलेल्या शेवटच्या घुमटाखालचा भाग म्हणजे ‘गर्भगृह’. कारसेवकांची आणि त्यांच्या नेत्यांची ‘रामजन्मभूमी!’ हा घुमट इतर दोन घुमटांपेक्षा दीडपटीने मोठा होता. संध्याकाळी ४.५५ वाजता तोही कोसळला. श्रीरामचा गगनभेदी जयजयकार झाला. `सियावर रामचंद्र की जय`बरोबरच `अब काशी मथुरा बाकी है`चा नारा दुमदुमला.

    साडेचारशे वर्षांची वास्तू गेली साडेचार दशकं वादग्रस्त झाली होती. गेली साडेचार वर्षं तिच्याभोवतीच्या मंदिर-मशीद वादाने सरकार, न्यायालय, प्रशासन यंत्रणा यांना पार खिळखिळं करून टाकलं होतं. रामजन्मभूमी बाबरी मशीद प्रकरण हा राष्ट्रीय राजकारणाचा मुख्य प्रश्न झाला होता. त्याचा निकाल कारसेवकांनी अवघ्या साडेचार तासांत लावून टाकला! हा कुणाचा विजय? कुणाचा पराभव?

    हे प्रश्न विचारायचे कुणाला? देशभर सध्या एक चर्चा आहे, एवढी टोलेजंग वास्तू इतक्या कमी वेळात भुईसपाट झाली कशी?  काहींना वाटतंय फक्त घुमटच पाडले! पण खरंच, सारी वास्तू रामनामाच्या गजरात भुईसपाट झाली. आम्ही डोळ्यांनी बघितली. लाखो डोळ्यांत ती साठवली. हे पाडणारे कोण होते? पाडणारे सारेच कारसेवक होते का? आता अयोध्येहून परतणारा प्रत्येकजण हाती पराक्रमाच्या दगड विटा नाचवीत वादग्रस्त वास्तू पाडण्यात आपण कसे आणि कुठे होतो, ते रंगवून रंगवून सांगतो. पुढेही सांगत राहातील.

    जे सुरुवातीला बाबरीवर चढले, ते बाबरी भुईसपाट करण्याच्या इराद्याने चढले नव्हते. पोलिसांकडून काहीच प्रत्युत्तर मिळेना, तेव्हा तेही गोंधळून गेले होते. विहिंपने कारसेवेच्या सुjवातीसाठी ज्या कारसेवकांच्या तुकड्या घोषित केल्या होत्या. त्यात आघाडीवर महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि राजस्थान राज्यातील कारसेवक मोठ्या संख्येने  होते. महाराष्ट्राच्या तुकडीत परभणी, पुणे, सातारा, सांगली या भागातील कारसेवक अधिक संख्येने होते. घुसखोर कारसेवकांनी वादग्रस्त वास्तूवर चढाई केल्यावर त्यांना घोषणा टाळ्यांनी बळ देण्याचं काम या कारसेवकांनी केलं. आघाडीवर असल्याने त्यांनी पराक्रमाच्या दगड विटाही मिळवल्या.

    डोक्यावरचा सूर्य पश्चिमेला झुकला. अयोध्येत या दिवसात संध्याकाळी पाचच्या सुमारास अंधार होता. वादग्रस्त वास्तूमधे जिथे ‘रामलल्ला’च्या मूर्ती होत्या, ती जागा झटपट साफ करण्यात आली. तोडाफोडीच्या वेळेस हलवलेल्या ‘रामलल्ला’च्या मूर्तीची पुनर्स्थापना करण्यात आली. ‘जय श्री राम’चा जयघोष होऊ लागला. रात्र झाली तरी कारसेवक हटेनात. कारण आता वादग्रस्त वास्तूचे भग्नावशेष हटवण्याचं आणि तिथे छोटंसं मंदिर बांधण्याचं काम सुरू झालं होतं. निर्णय पटापट घेतले जात होते.

    वादग्रस्त वास्तू पाडणारे आपल्या कॅम्पसमधे परतत होते. बरेचसे कारसेवक आता काही घडणार नाही. अशी अपेक्षा बाळगून आपल्या निवासस्थानी विश्रांतीसाठी जात होते. सोमवार ७ डिसेंबरचा सूर्य उगवण्यापूर्वीच वादग्रस्त बाबरी मशिदीच्या जागेवर छोटंसं मंदिर उभारलेलं दिसत होतं. निश्चयी मनाचे हात किती जलदगतीने ध्येय पूर्ततेपर्यंत पोहोचतात, याचा तो साक्षात्कार होता.

    अयोध्येतील काही भाग मात्र सहा डिसेंबरच्या रात्री आगीच्या विळख्यात होता. सोमवारी सकाळपासून गच्च भरलेली अयोध्या हळूहळू ओसरू लागली. अयोध्येसह आजूबाजूच्या फैजाबाद-लखनौ परिसरात कर्फ्यू होता, पण कारसेवकांसाठी तो माफ होता. कारसेवक परतीच्या प्रवासात घोषणा देण्याचे टाळत होते. फैझाबाद स्थानकावरून सुटणार्‍या रेल्वे गाड्या गच्च भरून निघत होत्या. टपावरही कारसेवक बसले होते. इंजिनात, इंजिनावर आणि इंजिनाच्या पुढेही कारसेवक लोंबकळत होते. इथवर त्यांचा विजयी उत्साह ओसंडून वाहत होता. 

    लखनौ येताच मात्र त्याला ओहोटी लागायची. डोक्यावरच्या ‘गर्वसे कहो’च्या पट्ट्या आणि रामनामाचे दुपट्टे, शाल दिसू नयेत अशाप्रकारे बॅगबंद होत होत्या. बाबरीच्या दगड विटांची लपवाछपवी तशीच होती. कारण परतीचा प्रवास जरा धोक्याचाच होता. वाटेवर मोहल्ले होते. आपण केलेल्या पराक्रमाची प्रतिक्रिया देशभर काय उमटली असेल, याचा अंदाज अयोध्येत येत नव्हता. कारसेवकांप्रमाणे बरेच नेतेही एव्हाना अयोध्या सोडू लागले होते. कदाचित उद्याचा अंदाज त्यांना आजच आला असावा. 

    अयोध्येत असलेल्या कारसेवकांनी मात्र नवीन मंदिराचं दर्शन घेण्यातच सोमवार घालवला. रामनामाचा जयघोष क्षीण होत चालला होता, पण अफवांना उधाण आलं होतं. विहिंप भाजपने त्यांच्या नेत्यांच्या अटकेपासून ते अगदी काँग्रेसच्या नरसिंह राव यांचं केंद्र सरकार कोसळण्यापर्यंतच्या अफवा पसरवल्या होत्या. दिल्ली, मुंबई, सुरत ही शहरं पेटल्याच्या आणि कापाकापीच्या बातम्यांना तर ऐकणारे कान हजार, अशी परिस्थिती होती. सोमवारपासूनच कारसेवकांनी आपला गाशा गुंडाळायला प्रारंभ केला होता. पण अजून वरिष्ठांकडून सूचना येत नव्हती. 

    ८ डिसेंबरच्या मंगळवारी पहाटे ‘रॅपिड ऍक्शन फोर्स’ने काही मिनिटांच्या कारवाईत ‘रामलल्ला’च्या नवीन मंदिराभोवती घेरा घातला आणि कारसेवकांना पिटाळलं. कारसेवकांनीही फारसा प्रतिकार केला नाही. उलट, उरलेल्या कारसेवकांनी झटपट अयोध्या सोडली. रेल्वेनेही त्यांच्या परतीच्या प्रवासासाठी भरपूर गाड्या सज्ज ठेवल्या होत्या.

    रॅपिड ऍक्शनची ही झटपट कारवाई अवाक करणारी होती. ही कारवाई बाबरीवर कारसेवकांनी चढाई केली, तेव्हा का नाही झाली? रॅपिड ऍक्शन फोर्स त्या दिवशी अयोध्येतच का नाही राहिलं? ते आदल्या दिवशी फैजाबादेत का परतलं? हे प्रश्न मला तरी पडले नाहीत. कारण सहा डिसेंबरच्या चार दिवस आधी बुधवारी रॅपिड ऍक्शन फोर्सचे कमांडंट सारस्वत हे ‘दिगंबर आखाड्या’पुढे भर रस्त्यात परमहंसजीच्या आणि खासदार महंत अवैद्यनाथजींच्या पाया पडताना मी पाहिले होते. तेही वर्दीमधे! 

    Comments

    Popular posts from this blog

    फुले शाहू आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यानो सावधान.......! (भाग – ११)

    फुले शाहू आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यानो सावधान.......! (भाग – १३)